Sharad Pawar Live : महाराष्ट्र, बंगालमध्येच छापेमारी का? पवारांनी संपूर्ण कारण सविस्तर सांगितलं
Sharad Pawar on ED: जिथं जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं तिथं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढलेल्या आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
जळगाव : जळगावमध्ये शरद पवारांचा (Sharad Pawar in Jalgaon) दौरा होता. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीबाबत भाष्य केलं. पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये (Maharashtra & West Bangal) छापेमारी का केली जाते, यावर सविस्तर उत्तर दिलंय. भाजपचा (BJP) सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवायांचा वापर केला जात असल्याचा आरोपच यावेळी शरद पवार यांनी केलाय. जिथं जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं तिथं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढलेल्या आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. राज्यात गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्याचं पाहायला मिळतंय. यावरुन केंद्र विरुद्ध राज्य अशा संघर्ष पेटलेला आहे. त्यावरुच संजय राऊत यांनीही पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं होतं. दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठीच महाराष्ट्र आणि बंगालमध्ये छापेमारी केली जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी जळगावात बोलताना केलाय.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलंय आहे की,
देशात दोन राज्यात केंद्राच्या एजन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. पश्चिम बंगला आणि महाराष्ट्रात आहे. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्याना काही करून सत्ता हातात हवी होती. त्यांना लोकांनी सत्ता दिली नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे हस्तक्षेप कसा करता येईल या कामाला लागले आहेत. त्यामुळे छापेमारी होत आहे.
पाहा Video : शरद पवार यांनी काय म्हटलं?
आतापर्यंत कुणाकुणावर कारवाई?
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागलंय. अनेकांवर कारवाईही झाली आहे. अनेकांच्या संपत्तींवर टाच आणली गेली आहे. तर काहीजणांवर आयकर विभागानंही धाडी टाकल्या होत्या. अनेकांना चौकशीमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे की काय, अशी शंका आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे घेतली जाते आहे.
- संजय राऊत – ईडीकडून मालमत्ता जप्तीची कारवाई
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्तीची कारवाई
- प्रताप सरनाईकांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई
- नवाब मलिकांना ईडीकडून अटक
- अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप
- अनिल परबांवर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा भाजपचा आरोप
- अर्जुत खोतकरांवर गैरव्यवहाराचे आरोप
- पवारांच्या कुटुंबीयांच्या घरी आयकराची छापेमारी