गुलाबराव पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने भाजपला मदत केल्याचा मोठा दावा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लोकसभेत भाजपला मदत केल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आगामी काळात देवकर आप्पा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
किशोर पाटील, Tv9 मराठी प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव देवकर यांनी आम्हाला लोकसभेत मदत केली आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि गुलाबराव देवकर यांच्यात झालेल्या भेटीवर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी याबाबतचा मोठा दावा केला.
काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची भेट घेतली होती. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मदत करण्यासाठी सुद्धा गुलाबराव देवकर यांनी मंगेश चव्हाण यांचा चहा पिला, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. गुलाबराव देवकर यांना मंगेश चव्हाण यांच्या जिल्हा दूध संघाचा चहा खूप आवडतो, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकरांना टोला लगावला.
गुलाबराव पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात कलगीतुरा
जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीवेळी गुलाबराव देवकर दिसले नाहीत. ते फक्त रावेर लोकसभा मतदारसंघातच फिरले, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला. दरम्यान, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यात काही दिवसांपासून कलगीततुरा रंगला आहे. याच दरम्यान मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. याच विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. परमेश्वराच्या साक्षीने आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी निष्ठेने लोकसभेत भाजपसाठी काम केलं आहे. त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी कसं वागावं? हा त्यांचा प्रश्न आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.