‘घुसून दाखवा’, जळगावच्या सभेआधीच लढाई सुरु, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
शिवसेना फुटीनंतर येत्या रविवारी जळगाव जिल्ह्यात ठाकरेंची पहिलीच सभा होणाराय. पाचोऱ्यात ही सभा होणाराय. मात्र त्या सभेआधीच गुलाबराव आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलयं. सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गटात आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय.
मुंबई : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच जळगावात (Jalgaon) सभा घेतायत. सुरुवात होतेय पाचोऱ्यातून. रविवारी होणाऱ्या या सभेचा टिझरही ठाकरे गटानं जारी केलाय. पण सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गटात आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाचं ज्या प्रमुख भागांवर लक्ष राहिलंय. त्यापैकी जळगाव जिल्हा एक आहे. सुषमा अंधारेंनी प्रबोधन यात्रेची सुरुवात जळगावातूनच केली होती आणि उद्धव ठाकरे खेड, मालेगावनंतर ठाकरे गट म्हणून स्वतंत्रपणे तिसरी सभा जळगावातच घेतायत. त्यामागचं नेमकं कारण काय आहे? ते पाहण्याआधी पार्श्वभूमी समजून घेऊयात.
जळगाव जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आहेत. त्यापैकी 2019ला चोपड्यातून लता सोनवणे, पाचोऱ्यातून किशोर पाटील, पारोळ्यातून चिमणराव पाटील, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील हे चार उमेदवार शिवसेनेतून जिंकले. भुसावळमधून भाजपचे संजय सावकारे, जळगाव शहरातून सुरेश भोळे, चाळीसगावातून मंगेश चव्हाण, जामनेरातून गिरीश महाजन हे चार जण आमदार झाले. अमळनेरमधून राष्ट्रवादीचे अनिल पाटील, तर रावेरमधून काँग्रेसचे शिरीश चौधरी जिंकले. तर मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं चंद्रकांत पाटील विजयी झाले होते.
यापैकी सध्या ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे चारही आमदार शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं जिंकलेले मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटीलही शिंदेंकडे गेलेयत. म्हणजे जळगाव जिल्ह्यातले सर्व आमदार या घडीला शिंदेंसोबत आहेत. आता शिंदेंसोबतच्या पाचही आमदारांसाठी यापुढची निवडणूक महत्त्वाची का आहे.
जळगाव जिल्ह्यात युतीतच पाडापाडीचं राजकारण
काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटलांच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो झळकला होता. त्यामागे निवडणुकांवेळी युतीत बेबनाव न येऊन देण्याचा संदेश दिल्याची चर्चा झाली. ते नेमकं का? तर याचं उत्तर 2019 च्या निवडणुकीत आहे. 2019 ला भाजप आणि शिवसेना युतीत लढली. पण जळगाव जिल्ह्यात युतीतच पाडापाडीचं राजकारण रंगल्याचे आरोप झाले. यावरुन जाहीर सभेतच गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांमध्ये बाचाबाचीही झाली होती. चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लताबाई सोनवणेंना राष्ट्रवादीच्या जगदिश वळवींचं आव्हान होतं. इथं भाजपच्या प्रभाकर सोनवणेंनी बंड केलं.
पारोळ्यात शिवसेनेच्या चिमणराव पाटलांविरोधात राष्ट्रवादीचे सतिश पाटील उभे राहिले. इथं भाजपचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळेंनी बंड केलं. जिथं उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे, त्या पाचोऱ्यात शिवसेनेचे किशोर पाटलांविरोधात राष्ट्रवादीचे दिलीप वाघ उभे होते. मात्र शिवसेनेची खरी लढत भाजपचे बंडखोर अमोल शिंदेंसोबत झाली. भाजप बंडखोर दुसऱ्या स्थानी राहिले, आणि शिवसेनेचे किशोर पाटील फक्त 2 हजार 44 मतांनी जिंकून आले.
जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेच्या गुलाबरावांविरोधात राष्ट्रवादीच्या पुष्पा महाजन उभ्या होत्या. इथं भाजपच्या झेडपी सदस्या माधुरी अत्तरदेंचे पती चंद्रशेखर अत्तरदे अपक्ष म्हणून उभे राहिले. अपक्ष असूनही त्यांनी भाजपचे झेंडे लावून प्रचार केला. परिणामी नंबर दोनची मतं भाजप बंडखोर अत्तरदेंनीच घेतली.
थोडक्यात ठाकरे गटाबरोबरच जळगावातल्या शिंदेंच्या आमदारांना युतीत पुन्हा 2019 सारखा बेबनावर रंगू नये, याचं आव्हान असेल. कारण पक्षाचे दोन गट झाल्यामुळे गेल्यावेळच्या मार्जिनमध्ये फरक पडेल आणि समजा त्यात जर मविआचा प्रयोग झाला. तर मात्र निवडणुका अजून रंगतदार होतील.