राजकारणात कुस्ती, पण कुटुंबात नाती, मतभेद बाजूला सारुन ठाकरे-शिंदे गटाच्या बहीण-भावाची भाऊबीज
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील तसेच ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भाऊबीज साजरी केली आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे.
जळगाव | 15 नोव्हेंबर 2023 : राज्यभरात आज भाऊबीज सण साजरा केला जातोय. राज्यातील नेतेमंडळी मोठ्या जल्लोषात भाऊबीज साजरी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीय वैर निर्माण झालं असली तरी कुटुंब म्हणून ते एक आहेत. गेल्या दोन ते चार दिवसांपासूनच्या घटनांमधून त्यांनी हा मेसेज दिलाय. अजित पवार काल शरद पवार यांच्या गोविंद बाग निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्यानंतर पवार कुटुंबियांचा एकत्रित फोटो समोर आला होता. विशेष म्हणजे राजकीय मतभेद बाजूला सारुन ठाकरे-शिंदे गटातीलही दोन बहीण-भाऊ भाऊबीजच्या निमित्ताने एकत्र आल्याचं बघायला मिळालं आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यात हा योग जुळून आलाय.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या चुलत बहीण आणि माजी आमदार आर. ओ. तात्या यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना मान्य नाही. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी या खंबीरपणे पाचोऱ्यात ठाकरे गटाची भूमिका मांडत असतात. दोन्ही बहीण-भाऊ वेगवेगळ्या गटातले असल्यामुळे त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय संघर्ष रंगलेला बघायला मिळतो. पण आपापसातील राजकीय मतभेद दूर सारुन या दोन्ही बहीण-भावांनी आपलं नातं जपण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही बहीण-भावांनी एकत्र येत भाऊबीज साजरी केली आहे.
नेमकं काय घडलं?
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील तसेच ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भाऊबीज साजरी केली आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे. यावेळी ठाकरे गटात असलेल्या बहिणीने वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या आमदार भावाचे औक्षण केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दोघांनी भाऊ बहिणीच्या नात्याला महत्त्व दिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेवेळी बहीण वैशालींचा किशोर आप्पांवर निशाणा
काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात भव्य सभा बोलवण्यात आली होती. या सभेला मोठी गर्दी जमली होती. वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेवेळी वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भावावरच सडकून टीका केली होती. याशिवाय किशोर आप्पा आणि वैशाली सूर्यवंशी यांच्यात सातत्याने वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं.