गुंतवणूक वाढल्याने सोने चकाकले, जळगाव बाजारात एका दिवसात इतक्या रुपयांची वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.
रवी गोरे, प्रतिनिधी, जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळवला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. सध्या लग्न सराईची धामधूम सुरू आहे. त्यामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. मात्र सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सुवर्णनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठलाय. गुरुवारी सकाळी सराफ बाजारात व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर सोन्याचे दर 3 टक्के जीएसटीसह 63 हजार 500 रुपये प्रति तोळा इतके नोंदवले गेले. गेल्या 24 तासात हे दर 1 हजार रुपयांनी वाढले आहेत.
एचयूआयडी नंबरची नोंदणी सक्तीची
१ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर तीन चिन्ह असलेले एचयूआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटीफिकेशन नंबर) नंबराची नोंदणी सक्तीची केली आहे. त्यासाठी शासनाच्या निगराणीखाली देशभरात हॉलमार्क सेंटर कार्यान्वित झाले आहेत. या प्रक्रियेतून सोन्याची शुद्धता, हॉलमार्क कुठल्या सेंटरवरून केले आणि हा दागिना कुठल्या सराफाकडचा आहे. या गोष्टी सहजच स्पष्ट होत आहे. भविष्यात दागिने खरेदी करणाऱ्याचे नावही यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
सुवर्ण धाग्यात कॅरेटनुसार सोन्याचे प्रमाण कॅरेट
दागिना किती कॅरेटचा आणि कुठून घेतला, याविषयी माहिती विचारताच चोरट्यांचा खरा चेहरा उघड करण्यासाठी एचयूआयडी नंबर, फायदेशीर ठरतो आहे. हॉलमार्कच्या आरशात चेहरा स्पष्ट होताच काही सराफी पोलिसांकरवी चोरट्यांभोवती कारवाईचा फास आवळत आहेत.
….तर सराफांच्या दंडाची पावती
हॉलमार्कबरोबरच सोन्याच्या दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांक अनिवार्य झाला आहे. या क्रमांकाविना सराफाने दागिने विक्री केल्यास संबंधिताला एक लाख रुपये किंवा दागिन्याच्या पाचपट किमतीचे दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे चोरट्यांकडून दागिने विकत घेणाऱ्या सराफी व्यावसायिकांचीही गोची झाली आहे.
आता दागिन्यातच दिसतोय चोरट्यांचा चेहरा
जळगाव केंद्र शासनाने सोन्याच्या दागिने विक्रीत पारदर्शकतेसाठी हॉलमार्क कायदा केला आहे. या कायद्याच्या फासात आता चोरटेही अडकायला लागले आहेत. भेसळयुक्त सोन्याची विक्री करणाऱ्या सराफ्यांसह चोरट्यांचेही हातपाय हॉलमार्कने बांधले आहेत.