घरांवरची पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त, जळगावात पावसामुळे हाहा:कार
जळगावात आज मान्सपूर्व आलेल्या पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रस्त्यावर अक्षरश: झाडे उन्मळून पडले आहेत.
जळगाव : निसर्गाचं चक्र नेमकं कसं फिरतंय काहीच समजायला मार्ग नाहीय, अशी भावना सध्याच्या घडीला राज्यातील सर्वसामान्यांच्या मनात आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल झालाय. त्यामुळे राज्यात पुढच्या आठ दिवसात मान्सून दाखल होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. असं असताना जळगावात आज मान्सपूर्व आलेल्या पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रस्त्यावर अक्षरश: झाडे उन्मळून पडले आहेत.
जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पाऊस झालाय. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वादळी वाऱ्यामुळे घरांवरची पत्रे उडून गेली, विजेचे खांबही कोसळले, केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.
रावेरच्या अहिरवाडी, केरळा, कर्जत या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांसह मेंढपाळांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. रावेर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. रावेर तालुक्यातील खानापूर, अभोडा, अजनाड, केऱ्हाळा, रसलपूर गावांमध्ये घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावतंय
राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल. पण त्याआधीच अरबी समुद्रात बिपरजॉय वादळ घोंघावतंय. या वादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल की नाही, याबाबत स्पष्ट माहिती समोर येईलच. पण त्याआधीच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज पावसाने फटकेबाजी केली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आज कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. जळगावात संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होत आहे. केरळमध्ये त्याचा परिणाम धीमा असेल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. १२ जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात अत्यंत तीव्र चक्रीवादळाची परिस्थिती राहणार असल्याचे दिसत आहे. केरळ, लक्षद्वीप, किनारपट्टीचा भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशता पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता आहे. ९ जूनपर्यंत दरम्यानं अंदमान निकोबारमध्ये पाऊस पडणार आहे, ११ जूनपर्यंत केरळमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात 15 जूनपासून मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता
केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही