विकास भदाणे, TV9 मराठी, जळगाव : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या चुकीमुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आदलाबदल झालेल्या शिशूंमध्ये एक स्त्री तर दुसरं पुरूष जातीचे अर्भक आहे. बाळांचं आदलाबदल झाल्यानंतर रुग्णालयात चांगलाच गोंधळ उडाला आहे. कारण मुलगा माझाचं असा दोन्ही मातांचा दावा आहे.
संबंधित प्रकरण प्रचंड वाढलं आणि पेच निर्माण झाल्याने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डीएनए चाचणीनंतर बालके मातेच्या स्वाधीन होणार आहेत. डीएनए चाचणीचा अहवाल येण्यासाठी 5 दिवस लागणार आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मंगळवारी (2 मे) दुपारी दोन महिलांची प्रसूती झाली. एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली; पण नवजात शिशू पालकांकडे सोपविताना निरोप देण्यात झालेल्या गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हातून ही चूक झाली. या चुकीमुळे नेमकं कोणतं बाळ कोणाचं? हा प्रश्न निर्माण झाला.
दोन्ही मातांनी मुलावरचं दावा केल्याने वाद वाढलाय. वाद वाढत असल्याने पाहून रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नवजात शिशूंना आपल्या ताब्यात घेतले. त्यांना नवजात बालक अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशू आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठित केली आहे. प्रशासन मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीय. नातेवाईकांनी प्रशासनावर भोंगळ कारभाराचा आरोप केलाय.
पालक, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्यातील सुरु असलेल्या या गदारोळात मुलांना मात्र आपल्या आईपासून लांब राहण्याची वेळ आली आहे. या मुलांचा सांभाळ सध्या प्रशासन करतंय. या दोन्ही नवजात बाळांना इन्क्युबेटर सेंटरमध्ये ठेवलंय. त्यांचा सांभाळ रुग्णालय प्रशासन करतंय. बाळांचा डीएनए रिपोर्ट समोर आल्यानंतर या बाळांना आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
या प्रकरणातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव मानला जातोय. जळगावातील ही घटना त्याचं ताजं उदाहरण आहे. स्त्रिया आज पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात. महिला वैमानिक, डॉक्टर, इंजिनियर, आयएएस, आयपीएस पदी आज विराजमान झाल्या आहेत. देशाच्या सध्याच्या विद्यमान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या देखील एक महिला आहेत. असं असताना देशातील काही लोकं आजही पुरुष अर्भकासाठी अक्षरश: भांडण करायला निघतात. या घटनेतून हेच दिसून येतंय. दोन्ही महिलांकडून फक्त मुलावर दावा केला जातोय.