पुणे | 2 सप्टेंबर 2023 : जालना शहरात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी राज्यभरात उमटत आहेत. शनिवारी मराठा आंदोलकांनी अनेक शहरात बंदची हाक दिली आहे. संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी सात बसेस जाळल्या आहेत. औरंगाबादमध्येही आंदोलकांनी जाळपोळ करून निषेध केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे माजी खासदार उदयनराजे भोसले जालना शहरात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीत जालनात झालेल्या घटनेवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत उद्या रविवारी महाराष्ट्र बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. मराठा समन्वयकांनी महाराष्ट्र बंद पुकारण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी नंदुरबार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने बंद मागे जरी घेतला असला तरीदेखील महामंडळाच्या एसटी बसेस १०० टक्के बंद ठेवण्याच्या निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आहे.
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून एकही बस बसस्थानक बाहेर न आल्याने सर्व प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. शाळा, दुकाने, व्यापारी प्रतिष्ठान बंद आहे. धारशिवमध्ये शांतता आहे.
जालना येथील सराटीमध्ये झालेल्या लाठीमारच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहेत. यामुळे पुणे शहरात अनुचित घटना घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त रितेशकुमार यांनी दिले आहे.