जालन्याच्या जाफराबादमध्ये तहसील कार्यालयात बेदम हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. युवक काँग्रेस कार्यकर्त्याला भाजप युवक कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. तसेच या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालयातच हा सर्व प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयात हा प्रकार घडला तेव्हा तिथले पोलीस किंवा सुरक्षा रक्षक कुठे होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गौण खजिनाचं अवैध उत्खनन केल्याची तक्रार केल्याने ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजप माजी जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाकडून मारहाण करण्यात आली. या व्हिडीओत भाजपचा कार्यकर्ता काँग्रेसच्या कार्यकर्त्याला प्रचंड मारहाण करताना दिसतोय. संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याप्रकरणी महत्त्वाची अपडेटही समोर आली आहे. सागर लोखंडे या भाजप कार्यकर्त्या विरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याला भाजपच्या युवक कार्यकर्त्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता. गौण खनिजाच अवैध उत्खनन केल्याची तक्रार दिल्याने, भाजपच्या सागर लोखंडे याने काँग्रेस कार्यकर्ता प्रमोद फदाड या तक्रारदारास मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या भाजपा कार्यकता सागर लोखंडेसह त्याच्या सहकाऱ्यांवर विरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. आघाडी आणि युतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये अभूतपूर्व अशा राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व आहे. या निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागांवर विजय मिळवता यावा यासाठी प्रत्येक पक्षाकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या गोटात रणनीती आखली जात आहेत. पण जाफराबादमध्ये घडलेल्या हाणामारीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. या हाणामारीचा फटका पक्षालादेखील बसतो. त्यामुळे भाजप संबंधित कार्यकर्त्यावर काय कारवाई करते, आणि काँग्रेस आपल्या कार्यकर्त्याच्या न्यायासाठी कशाप्रकारे कायदेशीर लढाई लढते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.