मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा तडीपार; विलास खेडकरसह इतर जणांवर थेट कारवाई, जालन्यात प्रशासन ॲक्शन मोडवर
Manoj Jarange Patil Vilas Khedkar : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी इशारा दिलेला असतानाच, दुसरीकडे जालना प्रशासनाने त्यांचा मेहुणा विलास खेडकर याला तडीपार केले आहे. काय आहे कारण?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी डबल इंजिन सरकारला मोठा इशारा दिला आहे. आपल्याला हलक्यात घेण्याची चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, असा सज्जड दम त्यांनी भरलेला आहे. त्यातच आता त्यांचा मेहुणा विलास खेडकर याला जालना प्रशासनाने तडीपार केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे समाजासाठी रान करणारे जरांगे पाटील आणि दुसरीकडे वाळू चोरीत त्यांचा हा मेहुणा अडकल्याचे समोर आल्याने चर्चा होत आहे.
जालना प्रशासनाचा वाळू माफियांना दणका
जालन्यात मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि मोठ्या गुन्हेगारावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. रात्री उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यासह ९ आरोपीवर वाळूच अवैध उत्खनन, वाळू चोरी, जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण, जाळपोळ आणि सरकारी कामात अडथळा या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना जिल्हा प्रशासनाने काल जोरदार दणका दिला.




आरोपी आंदोलनात सक्रिय
विशेष म्हणजे तडीपार करण्यात आलेल्या 9 आरोपींपैकी 6 आरोपी हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनांमध्ये सक्रिय होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या दगडफेकीनंतर उद्भवलेल्या हिंसाचारात मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर यासह इतर चार आरोपी वरती बस जाळल्याचा गुन्हा दाखल आहे.
अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांची कारवाई
जालन्यात वाळू माफीया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेले 9 आरोपी जालना जिल्ह्यासह बीड , छत्रपती संभाजीनगर ,परभणी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यावर पण तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड , घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.