‘आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे?’, भुजबळांची जरांगेंवर सडकून टीका
"छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सूनेला देखील आई म्हणून परत पाठवलं. तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर हात उचलले, लाज वाटली नाही तुम्हाला?", असा घणाघात छगन भुजबळांनी केला. "हे सगळं झाल्यानंतर लाठीचार्ज सुरु झाला", असा दावा भुजबळांनी केला.
जालना | 17 नोव्हेंबर 2023 : जालनाच्या अंबड तालुक्यात ओबीसी नेत्यांची मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केलं. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. “उपोषण केलं, काय झालं? पोलिसांचा लाठीचार्ज झाला. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला. पण 70 पोलीस, महिला पोलीसही रुग्णावयात दाखल झाले. दगडांचा मार खाऊन जखमी झाले. काय झालं? याला उठवायला अगोदर गेले. हे म्हटले, मी जरा झोपलोय, नंतर या. पोलीस गेले. ऐका आता, गच्चीवरुन त्यांनी सगळी तयारी तोपर्यंत करुन ठेवली. महिला होत्या त्याला संबोधित करण्यासाठी तिथे महिला पोलीस आल्या. त्यांनापण आणलं. जसं त्यांना निवेदन केलं तेवढ्यात दगडांचा प्रचंड मारा सुरु झाला. पोलीस फटाफट जमिनीवर पडले. पोलीस काय पाय घसरुन पडले का? त्यांना कोणी मारलं? हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
‘लाज वाटली नाही तुम्हाला?’
“राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिंदे गटाच्या नेत्या गोऱ्हे असतील, त्या महिला पोलिसांच्या घरी जा. तुम्हाला आम्ही पत्ते देतो. त्यांच्यावर काय बितली ते त्यांच्याकडून वधवून घ्या. काय झालं ते तुम्हाला सांगतील”, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सूनेला देखील आई म्हणून परत पाठवलं. तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर हात उचलले, लाज वाटली नाही तुम्हाला?”, असा घणाघात छगन भुजबळांनी केला. हे सगळं झाल्यानंतर लाठीचार्ज सुरु झाला”, असा दावा भुजबळांनी केला.
जालन्यातल्या लाठीचार्जवर भुजबळांची टीका
“आमच्या राज्यकर्त्यांना काय सांगायचं, एक दिवस आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच नाही. एकच बाजू आली की, पोलिसांनी लाठीचार्ज केला. महिला पोलिसांवर हल्ला झाला मग करायचं काय? लष्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हाला है, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है, इस दौर के फर्यादी जाए तो जाए कहाँ, अभी राज्य भी तुम्हारा और दरबार भी तुम्हारा हैं”, असं छगन भुजबळ शायरीतून म्हणाले. “आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.
भुजबळांची जरांगेंवर टीका
“लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जावून पळून झोपले. यांना हे अंबडचे आमचे मित्र टोपे साहेब (राजेश टोपे), दुसरे आमचे मित्र रोहित पवार, त्यांना घरातून रात्री तीन वाजता घेऊन आले. म्हणाले, बस तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. पण यांनी शरद पवारांना हे नाही सांगितलं की, लाठीचार्ज का झाला? शरद पवारांना आम्ही आजही उत्कृष्ठ प्रशासक समजतो”, असं भुजबळ म्हणाले.
भुजबळांची सरकारवरही टीका
“मराठा तरुणांची आज सहानुभूती गेली नसती. एसपीची सुद्धा चूक आहे. त्यांनी सांगायला हवं होतं की, माझे पोलीस रस्त्यावर एवढे पडले असताना मी काय करायला हवं? मी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना सांगितलं, तुम्ही गृहमंत्री आहात. तुमच्याकडे सगळी माहिती आहे. तुम्ही सांगायला हवं होतं की, माझ्या पोलिसांवर हल्ले झाले हे सहन करु शकत नाही. राज्याच्या देशाच्या पुढे हे खरं चित्र आलं नाही. उलट पोलिसांना सस्पेंड केलं. होम मिनिस्टरनेच माफी मागितली. गुन्हे मागे घेतले. किती लांगुलचालन करायचं? हिंमत वाढली. पोलीसही विचार करायला लागले. अरे आम्ही काही करायला लागलो तर आमच्यावर कारवाई. त्यामुळे जाऊद्या बीडमध्ये जे व्हायचंय ते होऊद्या”, असा दावा भुजबळांनी केला.
“प्रकाश सोळंके यांनी का सांगितलं? अरे आरक्षणाचा दोन-तीन टक्के लोकांना फायदा होतो. तुम्ही जरा शांत राहा. झालं. त्यांच्या घरी हे गेले. दोन दरवाजे… पहिला दरवाजा तोडला आणि ऑफिस, गाड्या जाळल्या. दोनशे ते चारशे लोक गेले. दुसरा दरवाजा तोडला. तिकडे हल्ला झाला. कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्ब होते. हा एकच ग्रुप नव्हता तर अनेक ग्रुप होते. कोडनंबर देण्यात आले होते. त्यावरुन चालायचं”, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला.