Manoj Jarange | ‘उपोषण सोडवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष या’, मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं फोनवर संभाषण काय?
मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंतरवली सराटी गावात उपोषणस्थळी बोलावलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जातात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
जालना | 12 सप्टेंबर 2023 : मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचं मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा या मुद्द्यावर एकमत झालं. त्यानंतर जरांगे यांनी आज दुपारी उपोषण सोडण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. उपोषण सोडलं तरी महिनाभर आंदोलन सुरु राहील, असं जरांगे म्हणाले.
विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती करण्यासाठी आज उद्योगमंत्री उदय सामंत रात्री उशिरा जालन्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. त्यानंतर त्यांनी आपला फोन मनोज जरांगे यांच्याकडे दिला. यावेळी मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी भूमिका मांडली.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
“मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. मी सांगितलं तुम्ही आम्हाला एक महिन्याचा वेळ मागितला होता. ते आम्ही ऐकलं. आता आम्ही तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो. पहिल्या समितीने तीन महिने मागितले. त्यांनी काम केलं नाही. आता आणखी एक महिन्याचा वेळ मागितला आहे. उपोषण सोडण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष यावं. मुख्यमंत्र्यांनी त्यावर ठिक आहे, असं उत्तर दिलं. मी सहकाऱ्यांशी बोलतो, असं ते म्हणाले. पण मी येतो, असं ते म्हणाले नाहीत”, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
‘आरक्षण बाजूला होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची इच्छा’
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. आरक्षण बाजूला होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी द्यावा. त्यांनी उपोषण मागे घ्यावं. मराठा समजाला आरक्षण मिळावं, अशी आमचीही इच्छा आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकावं, अशी आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.