जालन्यात ‘सार्वजनिक न्यास नोंदणी’ च्या नव्या इमारतीचे उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री राजेश टोपेंची ऑनलाइन उपस्थिती
जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची नवीन इमारत लोकांना आपली वाटली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा एवढीच अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हटले.
जालना: जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी), मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे, धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी, धर्मदाय वकील संघटनचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसाला समाधानाचे आयुष्य जगता यावे यासाठी काम करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य. त्यासाठीच धर्मादाय संस्थांच्या मदतीसाठी एक परिपूर्ण कार्यालय असणे जनतेसाठी हितकारक आहे.’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणाले?
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, एखादं पद, अधिकार लाभला की मी बरा, माझे कार्यालये बरे असं न समजता मिळालेल्या अधिकाराचा, पदाचा समाजासाठी वापर करणे गरजेचे आहे. आवश्यक तिथे पाठपुरावा करून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काही मागण्या करणे, तशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे नाही. सुविधांशिवाय कामं कशी होणार? जनतेची सेवा सुरळितपणे होण्यासाठी सोयी-सुविधा आणि मनुष्यबळांनी परिपूर्ण कार्यालय असणे आवश्यक आहे. कोविड काळात जास्तीत जास्त चांगली सेवा सर्वसामान्य माणसाला देता आल्याने जनतेचे प्राण आपण वाचवू शकलो. त्यामुळे या कामावर होणाऱ्या आरोपांना घाबरू नये. स्वत: राजेश टोपे या कामात पाय रोवून उभे राहिले..जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची नवीन इमारत लोकांना आपली वाटली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला समाधानी ठेवा एवढीच अपेक्षा.’
पालकमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?
या कार्यक्रम प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, अत्यंत सुंदर, सुबक वास्तू जी जालन्याच्या वैभवात भर टाकणारी आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे काम उत्तम व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या नव्या इमारतीत अनेक सुविधा आपण याअंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत. ट्रस्ट हॉस्पीटलच्या बऱ्याच तक्रारी. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आवश्यक, असे झाल्यास गरीब माणसाला त्याचा हक्क मिळेल आणि ज्या उद्देशाने ट्रस्टला जागा किंवा इतर सुविधा दिलेल्या असतात तो उद्देशही पूर्णत्वाला जाईल. धर्मदाय आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या.
इतर बातम्या-