मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; संभाजीराजे उपोषणस्थळी जाणार, अंतरवली सराटीत हालचाली वाढल्या
Manoj Jarange Patil Uposhan : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. काल रात्री त्यांना भोवळ आली होती. शंभुराज देसाई यांनी फोन करून उपचार घेण्याचा सल्ला दिला. आता अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. संभाजीराजे छत्रपतीदेखील अंतरवलीत जाणार आहेत. वाचा...
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. काल रात्री त्यांची तब्येत बिघडली. उपोषणस्थळावरून खाली उतरताना मनोज जरांगे यांना भोवळ आली होती. यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी फोन केला आणि उपचार घेण्याची विनंती केली आहे.
संभाजीराजे अंतरवलीत जाणार
अंतरवली सराटीत आता घडामोडींना वेग आला आहे. संभाजीराजे छत्रपतीदेखील अंतरवलीत जाणार आहेत. अंतरवलीत जात मनोज जरांगे यांची ते भेट घेणार आहेत. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. संभाजीराजे छत्रपती थोड्याच वेळात अंतरवलीत पोहोचतील. यावेळी दोघांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
तेलंगणातील ‘ती’ कागदपत्र सापडली
मराठा आरक्षणा संदर्भातील महत्वपूर्ण कागदपत्रं उपलब्ध झाली आहेत. तेलंगणा राज्य अभिलेखातून आणि संशोधन केंद्रातील दुर्मिळ दस्तऐवजामधून मिळालेली अनेक महत्वाची कागदपत्रं स्कॅन करून धाराशिवला आणण्यात आली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी करून आणण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेवरून धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती हैदराबादला पाठवली होती.
उपलब्ध झालेल्या दस्ताऐवजात हैद्राबाद गॅझेटीयरसह इतर अनेक महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदीसाठी ही कागदपञ महत्वाची आहेत. तज्ज्ञांकडून या कागदपत्रांचाअभ्यास सुरु आहे. या दस्तावेजमधून सरकारला मूलभूत पुरावे उपलब्ध होतील, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
परवा दिवशी जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले होते. यावेळी तणाव निर्माण झाला होता. यावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सातत्याने जालन्याच्या एसपींच्या संपर्कात आहे. आम्हाला मनोज जरांगे आणि हाके दोघांच्याही तब्येतीची काळजी आहे. मात्र जपून विधानं करणं देखील आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ओबीसींच्या मनात गैरसमज होता कामा नये. मराठा समाजाला देखील टिकणारे आरक्षण दिलेले आहे. बोलण्यातून संघर्ष निर्माण होतो. संयमाने बोललं पाहिजे, असं केसरकर म्हणालेत.