“शिंदे लबाड नाहीत, फडणवीस बेईमानी करणार नाहीत, अजितदादा काळीज असलेला माणूस, मनोजदादा विश्वास ठेवा”
Sambhaji Bhide On Manoj Jarange Patil and Maratha Reservation : मनोजदादा, माझी कळकळीची विनंती, सरकार शब्द पाळणारच, तुम्ही आंदोलन मागे घ्या...; पाहा काय म्हणाले संभाजी भिडे. मनोज जरांगे पाटील यांना काय विनंती केली.
जालना | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे देखील उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सरकार आपला शब्द पाळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत. तर उपमुख्यम अजिदादा काळीज असलेला माणूस आहे. विश्वास ठेवा मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. माझी मनोजदादा यांना विनंती आहे.त्यांनी विश्वास ठेवावा. आपलं उपोषण मागे घ्यावं, असं संभाजी भिडे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही मनोजदादांच्या सोबत आहोत. मागच्या अनेक दिवसात एवढ्या चांगल्या नेतृत्वाचं सरकार राज्यात नव्हतं. ते आता आलेलं आहे. ही माणसं शब्द पाळतील, यावर माझा विश्वास आहे. मनोजदादांसोबत आम्ही आहोत. याचा अर्थ जाणते लोक त्यांच्यासोबत आहेत. लाखो लोकांची ताकद त्यांच्यासोबत आहे, असंही संभाजी भिडे म्हणालेत.
मराठा समाजाला शंभर टक्के योग्य ते आरक्षण मिळेल, यासाठी मनोजदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत राहू. मनोज जरांगे यांची तीव्र इच्छाशक्ती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते लढत आहेत. ते काही त्यांच्या घरासाठी करत नाहीत. समाजासाठी झटत आहेत. त्यांच्यासाठी झटत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मराठा समाजाला आंदोलन मिळावं, ही माझी तीव्र इच्छा आहे, असं संभाजी भिडे म्हणाले.
संभाजी भिडे आले. कुणीही आलं तरी त्याचा पाठिंबा स्विकारणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे भिडे यांचा पाठिंबा आम्ही स्विकारत आहोत. कुणीही येऊन आम्हाला पाठिंबा देतो तेव्हा ताकद वाढते. तसं संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिल्यानेही आमची ताकद वाढली आहे. पण आम्हाला भावना महत्वाच्या नाहीत. तर आरक्षण महत्वाचं आहे. थोड्याच वेळात आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.