मनोज जरांगे पाटील यांचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना महत्त्वाचं आवाहन
"रास्ता रोको आंदोलनाची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये, लेकीबाळींमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपल्याकडून नाही तर इतर कुणी काही करण्याची भीती आहे. आपल्याकडून नाही तर कुणी दुसरीकडून करण्याची भीती आहे. आपली जबाबदारी फक्त रास्ता रोकोची आहे. रास्ता रोकोच्या 50 मीटरवर जरी काही झालं तरी ती करणाऱ्याची आणि सरकारची जबाबदारी आहे", अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
जालना | 23 फेब्रुवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला येत्या 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी सकाळी 10.30 वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. पण बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरु असल्याने अनेकांनी मनोज जरांगे यांना पत्राद्वारे मनोज जरांगे यांना रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे मनोज जरांगे यांनी रास्ता रोको आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आंदोलकांनी अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “आपण थोडासा यात बदल केला तर चांगलं राहील. मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं, एखाद्या लेकीबाळीचा पेपर राहायला नको. याची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. 24 तारखेचा रस्ता रोको आहे त्यामध्ये 11 ते 1 असा बदल करावा. या बदलमुळे कुणाला पेपरला जायचं असेल तर अडचण येणार नाही. हा बदल आपण आवश्य करावा”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
“अर्ध्या तासाने काही फरक पडत नाही. मराठा समाजाने हा बदल करणं अपेक्षित आहे. आपल्याला न्याय घ्यायचा असेल तर इतर समाजावर अन्याय होता कामा नये. माझ्याकडे पाच ते सात समाजाचे पत्र येऊन पडले आहेत. या समाजाने आपल्याला साथ दिली आहे. राज्यसभरात येत्या 24 तारखेला 11 ते 1 यावेळेत रास्ता रोको आंदोलन करु. त्यानंतर 25 तारखेपासून रास्ता रोको आंदोलनाचं रुपांतर काही दिवसांसाठी धरणे आंदोलनात करु. त्यामुळे परीक्षा आणि इतर कामांना अडचणी येणार नाहीत. हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
3 मार्चला रास्ता रोको होणारच
“आपल्या दारात एकाही राजकीय पक्षाने यायचं नाही हे कायमचं ठरलं आहे. तसेच 3 मार्चला रास्ता रोको ठेवलेला आहे तो फायनल आहे. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात एकावेळी एकाच ठिकाणी हा रास्ता रोको आंदोलन होईल”, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. “रास्ता रोको आंदोलनाची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये, लेकीबाळींमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपल्याकडून नाही तर इतर कुणी काही करण्याची भीती आहे. आपल्याकडून नाही तर कुणी दुसरीकडून करण्याची भीती आहे. आपली जबाबदारी फक्त रास्ता रोकोची आहे. रास्ता रोकोच्या 50 मीटरवर जरी काही झालं तरी ती करणाऱ्याची आणि सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे 24 तारखेचा रास्ता रोको 11 ते 1 यावेळेत करावा. त्यानंतर धरणे आंदोलन करा. हे धरणे आंदोलन कायम सुरु ठेवावं”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
मनोज जरांगे यांचं मोलाचं आवाहन
“प्रत्येक गावातून सरकारला निवेदन दिले जाणार आहेत की, सगेसोयरेंची अंमलबजावणी करा. रास्ता रोको केलं जाणार आहे. त्याची सुरुवात सकाळी साडेदहा वाजेपासून होणार आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको केलं जाणार आहे. मराठा समाजाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेला काही अडचणी यायला नको, याची जबाबदारी आहे. विद्यार्थीनींना सुद्धा परीक्षेला जाताना अडचणी यायला नको. लेकरामध्ये कधीच जात-धर्म नसतो. त्यांनाही परीक्षेला जाताना कधी भीती वाटायला नको. कुणालाही अडचण येणार नाही. अडचण आली तर मराठा समाज तुमची व्यवस्था करणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मराठा समाजानेदेखील सहभागी व्हावं. बंजारा बांधवांचासुद्धा नाशिक जिल्ह्यात सतीदेवीचा कार्यक्रम आहे. 5 लाख समाज सिन्नरला पोहोचला आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलनामुळे आपल्याला अडचणीत येतील, अशी भावना बंजारा समाजाची आहे. पण त्यांना आपण सांगितलं आहे की तुमच्याही गाड्या थांबवल्या जाणार नाहीत. शेवटी मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. मराठ्यांनी न्याय घेताना कधीच कुणावर अन्याय केलेला नाही. त्यामुळे आपण त्यांनाही शब्द दिलाय की तुम्हाला अडचण येणार नाही. शब्द देण्याचं कारण की, ते येवल्याचं एकटं सोडलं तर सगळा समाज आपल्यासोबत आहे. यामध्ये मुस्लिम बांधवसुद्धा आहेत. त्यामुळे आपल्या रास्ता रोकोमुळे त्यांना अडचण यायला नको, याची खबरदारी घ्यायची आहे”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.