‘राज्यात दंगल घडावी हे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न’, जरांगेंचा सर्वात गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज पुन्हा अतिशय गंभीर आरोप केले आहेत. "तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही. तुम्ही चक्रव्ह्यू रचला तो आम्ही तोडला. देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं की, पुन्हा राज्यात दंगल व्हायला हवी. आम्ही होऊ दिली नाही", असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय.
जालना | 26 फेब्रुवाराी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी आज उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले. “तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही. तुम्ही चक्रव्ह्यू रचला तो आम्ही तोडला. देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं की, पुन्हा राज्यात दंगल व्हायला हवी. आम्ही होऊ दिली नाही. राज्य काल बेचिराख होऊ दिलं नाही. पोलिसांनी काल लाठीचार्ज केला असता तर त्याला काही प्रत्युत्तर झालं असतं, तर पूर्ण राज्य पेटलं असतं. पुन्हा राज्य बेचिराख झालं असतं. डोके ठिकाणावर ठेवून तुम्ही विचार करुन बोला. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात. विचार करुन बघा, काल काय झालं असतं. तुम्ही बंगल्यात लपून बसला असता. पण राज्य जळालं असतं. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करणं जरुरीचं आहे. राज्यातल्या सगळ्या नागरिकांनीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“डॉक्टरांना बोलावलं आहे. उपचाराला कुठे जायचं ते आम्ही ठरवू. उपचार इथे घ्यायचे की दुसरीकडे जायचं ते आम्ही ठरवू. पण मी हटणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी होती. ती जबाबदारी मी पार पाडली. 5 हजार महिला होत्या आणि 25 हजार लोकं होतं. देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं. लोकं सैरावैरा रानात किती पळाले असते. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा लाठीचार्ज घडवून आणायचा होता. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
‘…तर सर्व मराठा समाज पेटून उठला असता’
“इथे आज सकाळी किंवा रात्रीसुद्धा लाठीचार्ज झाला असता तर सर्व मराठा समाज पेटून उठला असता. पुन्हा एकदा राज्य बेचिराख होण्यापासून मी वाचवलं आहे. पहिला हल्ला देवेंद्र फडणवीस यांनीच केलं होतं. अजून केसेस मागे घेतलेला नाही. त्यांना आतापर्यंत वाटलं असतं की, माझी जनता आहे. तर त्यांनी केसेस मागे घेतल्या असत्या. त्यांनी पोलीस बाजूला सारावेत. सागरचा दरावाजा सोडावेत. यायला तयार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी तयारीला लागा”, असा सल्ला मनोज जरांगे यांनी दिला.