‘कुणबी प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आत दिले तर पाहू’, मनोज जरांगे यांचा सरकारला अंतिम अल्टिमेटम?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलनासाठी येण्यावर ठाम आहेत. त्यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये, यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पण मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा आपला निर्णय मागे घेण्यास तयार नाहीत.
जालना | 18 जानेवारी 2024 : महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, अशी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीपासून अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला आंदोलनासाठी निघणार आहेत. ते 26 जानेवारीला मुंबईत दाखल होतील. मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन होणार आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण मनोज जरांगे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करु नये यासाठी आता मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी नोंदी देण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबीर आयोजित करुन 54 लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशानंतरही मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलन करण्याचा निर्णय बदलतील, अशी सरकारला आशा आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय.
‘प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आत दिले तर पाहू’
“त्या आदेशाची अंमलबजावणी होणार का? आतापर्यंत खूप आदेश झाले. आम्हाला 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र द्या, असे आदेश काढून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर बघावं लागेल. पण प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आत दिले तर पाहू”, अशी महत्त्वाची भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
“नुसता आदेश काढून चार-दोन लोकांना वाटलेलं आम्हाला मान्य नाही. आता मराठा फसणार नाही. वेळप्रसंगी माझा सरकारने जीव घेतला तरी मी तयार आहे. विशेष बाब करण्याचा सरकारला अधिकार आहे. मागील दोन महिन्यात तुम्ही काही केले नाही. ही तुमची चूक आहे. विशेष बाब करून 20 जानेवारीच्या आत हे करा. गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
‘आरक्षण मिळालं तरीही आणि नाही मिळालं तरीही मुंबईला जाणार’
“आज 18 तारीख आहे. आज अर्ज भरून घ्या. गावागावात तलाठी, ग्रामसेवक आहेत. उद्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप करा आणि तो प्रमाणपत्र वाटप केल्याचा डाटा आम्हाला द्या. 54 लाख नोंदी मिळाल्या म्हणतात. पण ते कुणाच मराठ्याला माहिती नाही”, असं जरांगे म्हणाले. “तरी आम्ही मुंबईला जाणारच, आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाल तरी मुंबईला जाणार. आरक्षण मिळाल्यावर गुलाल टाकायला मुंबईला जाऊ”, अशीदेखील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.