‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको’, नारायण राणे यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे म्हणाले…
"मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यायला नको", अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मांडलीय. त्यांच्या या भूमिकेबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
जालना | 14 सप्टेंबर 2023 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं जातप्रमाण देण्यात यावं, अशी मागणी केलीय. त्यांच्या या मागणीवर नारायण राणे यांनी भूमिका मांडली. मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. याउलट आर्थिक आणि सामाजिक निकषांवर आरक्षण देण्यात यावं, असं मत नारायण राणे यांनी मांडलं. तसेच 96 कुळी मराठा समाजाच्या नागरिकांची कुणबी प्रमाणपत्राची मागणी नाही, असंही नारयण राणे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
“नारायण राणे काय म्हणाले त्यावर मी काही बोलणार नाही. मी त्यांना महत्त्व देतो. मी त्यांना खूप मानतो. ते आदरणीय नेते आणि सगळ्यात मोठे नेते आहेत. सरसकट समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मागणी आहे. पण कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचे की नाही? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘कोणावरही जोर जबरदस्ती नाही’
“ज्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे, आपल्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी आरक्षण लागत असेल तर ते कुणबी प्रमाणपत्र काढू शकतात. कोणावरही जोर जबरदस्ती नाही की, कुणबी जात प्रमाणपत्र घेतलच पाहिजे. ज्यांना आवश्यक आहे ते जात प्रमाणपत्र काढू शकतात”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“तहसीलदार असो किंवा एस.डी.एम. ते तुमच्या बांधवांच्या घरी कुणबी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रभर आणून देणार नाही. तुम्ही गेलात तरच ते दाखला देणार आहेत, जर कुणबी जात प्रमाणपत्र लागू झालं तर कुणावरही जबरदस्ती असणार नाही. ज्यांना शिक्षणासाठी, आयुष्य खराब होत असेल तर अस्तित्वासाठी हा दाखला गोरगरीब मराठ्यांची पोर घेऊ शकतात”, असं स्पष्ट मत मनोज जरांगे यांनी मांडलं.
“ही आंदोलनाच्या पाठीमागची मूळ भूमिका आहे आणि म्हणून सरसकट मराठ्यांच्या पोरांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आले पाहिजे. आता पोरांसाठी आवश्यक आहे आणि ते मिळणार आहे आणि आंदोलन थांबणार नाही. आता साखळी उपोषण सुरू केले आहे”, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.