Manoj Jarange Patil | मनोज जरांगे अजित पवार यांच्यावर संतापले, उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सडकून टीका
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्या एका वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार यांनी आपल्या भाषणात केलेलं एक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
संजय सरोदे, Tv9 मराठी, जालना | 23 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. मनोज जरांगे यांच्या सभेला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नागरीकही का जातात? असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. त्यांच्या याच वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पावर यांच्यावर निशाणा साधलाय. “अजित पवार यांनी आमच्यात फूट पडायचं ठरवलं आहे काय? आम्ही भाऊ-भाऊ आहोत आणि आम्ही येणारच. तुमची जी भावना आहे ती त्यांची नाही. त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण भेटावं, तुम्ही याच्यासाठी बाहेर पडले काय? एवढे दिवस तर मराठा आंदोलनावर बोलले नाही”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी सुनावलं.
“तुम्हाला सरकारने यासाठी पुढे घातलं आहे काय? आम्ही भाऊ-भाऊ आहोत. आमच्यातील एकी तुम्हाला बघवत नाही का? तुम्हाला यायचं नाही आणि आता मिठाचे खडे टाकता का? आमच्या तोंडात घास येत असताना त्यामध्ये माती कालवता का? तुम्हाला कोणी बंधनं घातली का येऊ नका म्हणून? लोक येऊन पाठबळ देत आहेत आणि गरीब मराठ्यांचे कल्याण होईल, तर तुमचं पोट का दुखत आहे?”, असे तिखट प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून उपस्थित केले आहेत.
‘दगा फटका केल्यास सोईचे जाणार नाही’
“मंत्री गिरीश महाजन साहेब आम्ही हातघाई केली नाही. तुम्ही म्हणाला होता, चार दिवसात होत नाही, एक महिना द्या. आम्ही चाळीस दिवस दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मराठा समाजाने खाली पडू दिला नाही. त्यांच्या शब्दाचा मान-सन्मान केला, आणि आता तुम्ही आम्हाला चॉकलेट फेकून हाणत आहात का? आता तुम्ही हातघाई करू नका हे शिकवायले का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
“मराठा समाजाशी तुम्ही दगा फटका केल्यास सोईचे जाणार नाही. असे बोलू नका तुमचे शब्द आहेत, चार दिवसात होणार नाही एक महिना द्या. आम्ही चाळीस दिवस दिले. तूम्ही दोन दिवसात मराठा समाजाला आरक्षणात टाका, बाकीचे बहाणे आम्हाला आता सांगायचे नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा मराठा समाजाने मान सन्मान केला आहे, त्यांच्याशी दगा फटका करू नका. तुमच्या शब्दावर तुम्ही खरे भरा, लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री एकदा शब्द दिला की बदलत नाहीत, म्हणून यावर तुम्ही प्रामाणिक राहा. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल”, असं मनोज जरांगे म्हणाले.
’25 तारखेनंतरचे युद्ध तुम्हाला जड जाईल’
“मराठा आरक्षणाबाबत सरकारला सर्व पर्याय सांगितले आहेत. 24 तारखेनंतर तुम्ही आमच्याकडे यायचेपण नाही. 24 तारखे अगोदर तुम्हाला काही कायदेशीर माहिती लागली तर मराठा समाज म्हणून आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. 25 नंतर आम्हाला आंदोलन करण्यास लावू नका. नाहीतर 25 तारखेनंतरचे युद्ध तुम्हाला जड जाईल”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.