‘तुमचं दूध, धान्य बंद करु’, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली भूमिका ठेवली. सरकारकडून मनोज जरांगे यांना 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनासाठी न येण्याचं आवाहन केलं जात आहे. पण मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
जालना | 3 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक येतील, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच या आंदोलनाला येणाऱ्या आंदोलकांना सरकारने अडवलं किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत जाणारं धान्य, दूध बंद करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आमचा गॅस बंद केला तर लाकडं पेटवू, असं जरांगे म्हणाले. तसेच त्यांनी आपण 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाला जाण्यावर ठाम आहोत, अशी भूमिका मांडली. “आमचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“त्यांनी आमच्या गाड्यांना डिझेल दिलं नाही, त्यांनी आम्हाला गॅस घेऊ दिला नाही, आमचं नेट बंद केलं, आम्हाला तेल-मीठ घ्यायचे दुकानं बंद केले, तरी आम्ही बिगर डिझेलवर गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. हे कोणालाच माहिती नाही. तिथे बिगर डिझेलच्या गाड्या दिसतील. त्यांनी गॅस बंद केला तर आम्ही चूल पेटवू. पण तुमचं दूध बंद होणार. आमचा मायबाप मराठा शेतकरी तुम्हाला दूध देणार नाही. आम्ही इकडे त्याचं तूप, दही करु, पण तुम्हाला देणार नाही. तुम्ही बाजरी, गहू खायचेच नाहीत, ते सुद्धा देणार नाहीत. सोयाबीनही देणार नाही. आम्ही दाळी देणं बंद करु. तुम्ही त्या टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्या खायच्या. तुम्हाला दुसरा चान्सच नाही. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल, तसा तुम्हाला त्रास होईल”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
‘मुंबईत नाही घुसू देणार म्हणजे?’
“मुंबईत नाही घुसू देणार म्हणजे काय? मुंबई फक्त त्यांची एकट्याची आहे का? मुंबई आमचीसुद्धा आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे. तिथे सर्व देशातील काळे-पांढरे लोकं येतात. आम्ही काय महाराष्ट्रातले आहोत, आम्हाला बघू द्यायचं नाही का कुणाचं घर कसं, विमान कसं, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसं असतं, आम्हाला बघायला यायचं आहे. आमची मुंबई आहे. त्यांनी सांगावं की, तुम्ही महाराष्ट्रातले नाही, मग आम्ही आसामला राहायला जातो”, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला.