जरांगेंना पत्नी, मुलींनी कवटाळलं, मुलाची मिठी, अश्रू आणि फक्त अश्रू
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. त्यांचा मोर्चा आज जालन्याच्या शहागड गावात पोहोचला तेव्हा अतिशय भावूक क्षण बघायला मिळाला. मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं. मनोज जरांगे यांच्या पत्नी, तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळत होते. सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.
दत्ता कानवटे, Tv9 मराठी, जालना | 20 जानेवारी 2024 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सकाळी जेव्हा अंतरवली सराटी गावातून निघाले तेव्हा ते अक्षरश: रडले. त्यांना अश्रू अनावर झाले. आपण परत येऊ का माहिती नाही, पण आपले विचार जिवंत ठेवावेत, मराठा आरक्षणाची लढाई कायम ठेवावी, असं आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केलं. मराठा आरक्षणाच्या या लढाईत सरकारने आपल्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील पण आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. मनोज जरांगे यांनी गाव सोडलं तेव्हा संपूर्ण गावकरी भावूक झाले. त्यानंतर त्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेला रवाना झाला. या दरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे. मनोज जरांगे यांचा मोर्चा जालन्याच्या शहागड गावात पोहोचला तेव्हा अतिशय भावूक क्षण बघायला मिळाला. मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं. मनोज जरांगे यांच्या पत्नी, तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळत होते. सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते.
यावेळी जरांगे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. ते आपल्या पोटच्या लेकरांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत होते. जरांगे यांच्या पत्नी यावेळी ढसाढसा रडत होत्या. जरांगेंच्या पत्नींनी त्यांना ओवाळलं. त्यानंतर त्यांना एक घट्ट मिठी मारली. त्यांच्यासोबत तीन मुली होत्या. या मुलीदेखील आपल्या वडिलांना बिलगत होत्या. जरांगेच्या डाव्या बाजूला मुलगा होता. तो वडिलांना सावरत होता. हा क्षण कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झालाय. संपूर्ण जरांगे कुटुंबिय रडत होते. जरांगे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढाई लढत आहेत. या लढाईसाठी त्यांनी दोनवेळा आमरण उपोषण केलं. ते अनेक महिन्यांपासून आपल्या स्वत:च्या घरी देखील गेले नाहीत. कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू सहन होत नाही म्हणून जरांगे कुटुंबियांना जवळ येऊ देत नव्हते. पण आज कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला. जरांगे यांचे कुटुंबिय त्यांना भेटायला आलं.
‘पप्पा विजय घेऊन 26 जानेवारीला थेट शाळेत या’, मुलीचं जरांगेंना आवाहन
मनोज जरांगे यांची पुढची आंदोलनाची लढाई महत्त्वाची आहे. त्यामुळे जरांगे यांचे कुटुंबिय त्यांचा उत्साह वाढव्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलं. जरांगे यांच्या तीनही मुलींनी आपल्या वडिलांना जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. “मला लहान मुलीने सांगितलं आहे की, पप्पा 26 जानेवारीला शाळेत कार्यक्रम आहे, विजय घेऊन याल तर डायरेक्ट शाळेत विजय घेऊन या. पोरांनी सांगितलं यशस्वी होऊन ये. माझं कुटुंब माझ्यासोबत ठाम आहे. माझं काहीही झालं तरी मी मराठा समाजासाठी लढणार आहे आणि आरक्षण मिळवणार आहे”, असं जरांगे यांनी यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं. हा सर्व प्रसंग ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात कैद झालाय.
यावेळी आम्ही जरांगे यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जरांगेंचे कुटुंबिय भावूक झालेले होते. मुली प्रचंड रडत होते. तरीदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. “पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील. नक्की. आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहोत. पण पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं”, अशी प्रतिक्रिया जरांगेंच्या मोठ्या मुलीने दिली. “पप्पा तुम्ही फक्त आरक्षण घेऊन या. आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. आमची काळजी करु नका”, अशी प्रतिक्रिया जरांगेच्या दुसऱ्या मुलीने दिली. तर “पप्पा आरक्षण घेऊन लवकर घरी या”, असं तिसरी मुलगी म्हणाली.
यावेळी आम्ही जरांगे यांच्या मुलाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “मी पप्पांना म्हटलं आपल्याला विजयच घेऊन यायचा आहे. आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तब्येतीची काळजी घ्या”, असं आवाहन मुलाने वडिलांना केलं आहे. यावेळी जरांगे यांच्या पत्नी खूप रडत होत्या. त्यांनीदेखील टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. “आतापर्यंत त्यांना साथ दिली. यापुढेही अशीच साथ देईन. पण सरकारने आरक्षण द्यावं”, असं जरांगेंच्या पत्नी रडत-रडत म्हणाल्या.
मनोज जरांगे भावूक, म्हणाले…
“मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की, माझं कुटुंब हा मराठा समाज आहे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला म्हणजे माझ्या कुटुंबाला आनंद होणार आहे. कारण माझ्या कुटुंबाचासुद्धा तोच पण आहे की, समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळावं आणि समाजाची लेकरं मोठी व्हावी. आता जसं हे गाव मला भेटायला आले तसेच ते कुटुंब म्हणून मला भेटायला आले आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“माझ्या समाजापेक्षा मला काय मोठं आहे, मला माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझं कुटुंब सुद्धा बाजुला लोटलं आहे. याची कदर माझ्या समाजालासुद्धा आहे. समाज माझा मायबाप आहे. मी सकाळी फक्त एक आरोडी टाकली 15 ते 20 लाख मराठा समाज सोबत उभा राहिला. मी शिवाच्या बाहेर चाललो आहे, पुन्हा येईली की नाही ते माहिती नाही. पण माझा विचार टिकवा. माझ्या मराठा समाजाची एकजूट तुटू देऊ नका. मी तुमच्यात असेल नसेन, ते मला माहिती नाही. पण मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळाल्याशिवया मागे फिरायचं नाही. सरकारने मला गोळ्या जरी झाडल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मुंबईकडे निघालो आहे, मोकळा माघारी परतणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.