मनोज जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप; काय म्हणाले जरांगे?
"मुख्यमंत्र्यांना आम्ही चांगलं मानतो. शिंदे साहेबांना आजपर्यंत आम्ही चांगलं मानतो. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहिती? आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागलेत. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत नेऊ लागले आहेत", असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ओएसडी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील काही जणांना दिल्लीत घेऊन जात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. “काहीजण तिकडे प्रसिद्धी मिळत नाही म्हणून ते इकडे आंदोलन करायचं म्हणत आहेत. त्यांचे काय गाव जळाले आहेत का? मुद्दाम तुम्हाला जाती-तेढ निर्माण करायचा आहे. ओबीसी नेते स्वतःला प्रगल्भ विचारायचे म्हणून घेतात आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार म्हणतात. जिथे तेढ निर्माण होईल तिथे तुम्ही बसणार का? शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन नुसते भाषण ठोकतात. हे सरकारचं षडयंत्र आहे. मुख्यमंत्र्याला आम्ही चांगलं मानतो. शिंदे साहेबांना आजपर्यंत आम्ही चांगलं मानतो. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहिती? आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागलेत. आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत नेऊ लागलेत. काय षड्यंत्र रचले ते थोड्या दिवसात उघडे पडेल”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांना मी आजही चांगलं मानतो. मात्र त्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत. मुंबई संपली. आता दिल्लीला पळत आहे. काय साचा बनवून आणला असेल? मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी? हे षड्यंत्र सरकार करत आहे. काय सरकार, काय ओएसडी? मुख्यमंत्र्याना आम्ही खूप चांगलं मानतो. मला सरकारने 100 टक्के खेळवले. विमानतळावर सीसीटीव्ही अमुक सर्व आहे. कोण गेलं, कोण उतरलं ते कळतं. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं ओएसडीचे काम आहे. वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे?” असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
“कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल असेच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल. मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की मी असंच उपोषण स्थगित करू शकत नाही. काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का? किती दिवसात करणार आहेत? केसेस लगेच मागे करणार की किती दिवसात करणार? याचे मला डिटेल पाहिजे. उपोषण सुरू आहे तोपर्यंत सांगायचं”, असं चॅलेंज मनोज जरांगे यांनी दिलं.
ओएसडी कोण? मनोज जरांगे म्हणाले…
यावेळी मनोज जरांगे यांना ओएसडी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. “समाजालाही माहिती आहे. 15 लाख वाटायला कोणता ओएसडी निघाला होता. नेहमी मध्ये मध्ये बुळबुळ कोण करतो. थांबा नावच घेईन. पुढचे षड्यंत्र काय करतो ते पाहू. त्यांनी ते षडयंत्र नाही थांबवलं तर धडाधड नाव घेऊ. तीन नावं आमच्याकडे आली आहेत”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. “आम्ही थोडे दिवस उपोषण करू. आम्ही तरी किती दिवस उपोषण करणार? तुम्ही जाणून-बुजूनच आम्हाला मारायला निघाला तर गोरगरीब मराठी सर्व जाती धर्माचे लोक विधानसभेच्या तयारीला लागतील”, असा देखील इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
‘सगेसोयरेच्या व्याख्येप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करा’
“उपोषण असे कसे स्थगित होईल, त्यांनी त्यांचे लोक इथे पाठवून जाहीर करावं की हे किती दिवसात करतील. 57 लाख नोंदी मिळाल्यात. त्याच्या आधारे कायदा किती दिवसात पारित करतील, किती दिवसात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतील? हे स्पष्ट करायला हवं. उपोषण स्थगित होईल. पण किती दिवसात करणार आहेत? का लगेच करणार आहेत? असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही दिलेल्या सगेसोयरेच्या व्याख्येप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
“एवढा मोठा विषय मराठ्यांच्या आयुष्याचा आहे. लांबून गोळ्या मारून होत असतं का? प्रत्यक्ष चर्चा करूनच होईल. माझ्या मते प्रत्यक्ष चर्चा करून विषय गोडीगुलाबीने हाताळा. उगाच जाळं रचून, षडयंत्र रचून तयारी करू नका. मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते कोणीही द्या. आमचा शिंदे साहेबांवरती, सरकारवरती आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत हे मी मागे सांगितलं आहे. ते कार्य करतात ते आपल्याला जमत नाही. जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही. त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का? आम्हाला आरक्षण द्या. कोणीही द्या. मराठा त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील”, असं मनोज जरांगे म्हणाले.