‘फॉर्म भरणे माझा निर्णय नाही, हा समाजाचा निर्णय’, जरांगे यांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे ऐकतात आणि आमचा करेकट कार्यक्रम करा म्हणतात. पण मर्यादा तोडल्या तर मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करेल", असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं.
संजय सरोदे, Tv9 प्रतिनिधी, जालना | 8 मार्च 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. लोकसभा निवडणुकीत आता मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. याचबाबत मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. “मराठ्यांचा लढा राजकारण म्हणून बघू नये. आता मराठा एकत्र आला आहे. एकजूट फुटू द्यायची नाही. सगेसोयऱ्यांबाबत सरकारची काही दिवस वाट बघू. देवेंद्र फडणवीस यांना वाटते मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. दिलेल्या 10 टक्के आरक्षणामुळे मराठा खुश आहे, असं वाटतं. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितले. तुम्ही 10 टक्के दिलं म्हणून मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर तुमच्या अंगावरचा गुलाल 15 दिवस निघाला नसता”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“माझ्या नादाला लागू नाका. नाहीतर तुमचा टांगा पलटी करू. आरक्षण विरोधात बोलला की वाजवलाच मग तो कोण्याही पक्षाचा असो. माझी चौकशी लावली आहे. ज्यांची चौकशी लावली की त्यांच्याकडे जातात. मला 10 टक्के आरक्षण घ्या म्हणतात. मी नाही म्हणालो की माझी एसआयटी चौकशी करू म्हणतात. ते म्हणतात माझ्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू , वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर माझ्यामागे आहेत. पण माझ्या मागे कुणी नाही. माझ्या मागे समाज आहे”, असं जरांगे म्हणाले.
‘एक दिवस उपोषण करून बघ…’
“नऊ दिवस झाले एसआयटीची वाट बघत आहे. येवल्यावाला कुठे गेला काय माहीत, कुठे गार पडला आहे? त्यांनी गुन्हे दाखल करण्यात शेवटची ताकत लावली आहे. तुम्ही यांना (नेत्यांना) मोठं केलं आहे, ते येतात का तुमच्याकडे? मी बोललो तर सर्व नेते एकत्र आले. पण नागपूर आणि मुंबई अधिवेशनात नाही बोलले. तुमचा नेता सहा महिने झाले मराठा समाजाला वेड्यात घेत आहे. मी एकदा बोललो तर सर्व अधिवेशन डोक्यावर घेतले. एक दिवस उपोषण करून बघ, चंद्र आणि चांदण्या दिसतील”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘मी ओबीसीमधूनच आरक्षण घेणार’
“आम्ही आई-बहिणीवर बोलले तर राग आला. मग अंतरवलीमध्ये महिलांवर लाठीमार केला तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का? सत्ता असली की मस्ती करता, 10 टक्के आरक्षण नाही घेतले. तर अटक करा म्हणता. स्वतःच्या आई-बहिणीमध्ये आमची आई-बहीण बघा. मी 10 टक्के आरक्षण घेत नाही. मी ओबीसीमधूनच आरक्षण घेणार”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.
‘आता मराठे फॉर्म भरत आहेत’
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे ऐकतात आणि आमचा करेकट कार्यक्रम करा म्हणतात. पण मर्यादा तोडल्या तर मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करेल. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही. ते काही माझे करू शकत नाहीत. माझ्या घरावर तुळशीपत्र आहेत. आता मराठे फॉर्म भरत आहेत, त्यांची फजिती होणार आहे आणि टेन्शन येणार आहे. फॉर्म भरणे हा माझा निर्णय नाही हा समाजाचा निर्णय आहे”, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं.
“माझे नियोजन आहे, ओबीसीमधून आरक्षण. आता फोन आला आणि केला तर फक्त आरक्षणावरच बोलायचं. आता मला सरकार सत्तेच्यामधील काटा समजतात आणि याला बाजूला करा म्हणतात. सरकारने खोटे गुन्हे दाखल केले तर आता अंतरवालीसारखे चार ते पाच मराठे एकत्र आले पाहिजेत. 75 वर्षात घडले नाही ते या पाच वर्षात घडले आणि सर्व पक्षाचे सरकार आले, असे कधी झाले का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगतो सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, सावध रहा माझ्या नादाला लागू नका”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.