मनोज जरांगे पाटील जेव्हा लेझीम खेळतात, पाहा भन्नाट VIDEO
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ समोर आला असतानाच, आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मनोज जरांगे यांनी ढोल-ताशांवर ठेका धरला आहे. मनोज जरांगे या व्हिडीओत अतिशय अचूकपणे ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरताना दिसत आहेत.

जालना | 29 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढणारे धडाकेबाज नेते मनोज जरांगे पाटील यांचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम देणाऱ्या या डॅशिंग नेत्याने आज चक्क ढोल-ताशे आणि हलगीच्या तालावर लेझीम खेळली आहे. त्यांचा लेझीम खेळातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मनोज जरांगे पाटील अतिशय सुंदर आणि खूप छान लेझीम खेळताना दिसत आहेत. ढोल-ताशांच्या तालावर, योग्य वेळी ते अतिशय अचूक ठेका मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे मनोज जरांगेच आहेत ना? असा प्रश्न आपल्या मनात एकदा येऊन जाईल. पण निरखून पाहिल्यावर हो हे मनोज जरांगेच आहेत, अशी तुमची खात्री पटेल. मनोज जरांगे यांचा नुकताच क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता त्यांचा जालन्यात लेझीम पथकासोबत लेझीम खेळताचाना व्हिडीओ समोर आला आहे.
मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी देशभरातील मराठा समाजाला येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आंदोलकांना शांततेत मुंबईला येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच आंदोलकांनी सोबत येताना खाद्यपदार्थ, आणि इतर जीवनाश्यक वस्तू घेऊन येण्याचं आवाहन केलं आहे.
मनोज जरांगे यांचा लेझीम खेळतानाचा व्हिडीओ बघा :
‘तुम्ही आरक्षण देणार आहेत का? जर देणार असाल तर…’
दरम्यान, मनोज जरांगे यांनी प्रतिक्रियादेखील दिलीय. “तुम्ही आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करू नका. गाड्या अडवण्याचा प्रकार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नागपूर आणि मुंबईच्या घरासमोर जाऊन बसणार. किती गुन्हे दाखल करायचे ते करा. अहवाल कितीही येऊ द्या, मुंबईला जाण्याचे रद्द नाही. तुम्ही आरक्षण देणार आहेत का? जर देणार असाल तर आम्ही येणार नाही. २० तारखेला आम्ही निघणार आहोत. २० तारखेला मराठे मुंबईला जाणार आहोत आणि आरक्षण घेऊन येणार आहोत”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
“आमचा संयम आहे, मराठे निघाले आहेत. मुंबईतील सगळे मैदाने लागणार आहेत. सरकारने आमची व्यवस्था करावी. नाहीतरी आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत. मुंबईत ३ कोटी मराठे येणार आहेत. आम्ही लोकांच्या हिशोबाने जाणार आहोत. कुणाला आजारी पाडून आम्हाला आंदोलन करायचे नाही. आम्ही पायी मुंबईला जाणार आहोत”, असंही ते म्हणाले आहेत.