शरद पवार, उदयनराजे भोसले यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे घेणार का? मनोज जरांगे पाटील म्हणाले…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज आंतरवाली सराटी गावात दाखल झाले. दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
जालना | 2 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात जावून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी शेकडो मराठा आंदोलक जमले आहेत. या दरम्यान आंदोलनस्थळी काल पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये जवळपास 100 आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतरही मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरुच आहे. आता शरद पवार आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर आंदोलन मागे घेणार का? असं जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.
“आमच्या मराठवाडा आणि मराष्ट्रातला 50 टक्के आतला विषय आहे. आम्ही पूर्वीपासून 50 टक्क्यांच्या आतमध्ये आहोत. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या माता-माऊलींवर विनाकारण इतका भ्याड हल्ला केलाय की राज्यात, देशात असा हल्ला झाला नव्हता. हा हल्ला करणाऱ्यांना आधी निलंबित करा. आमच्यावर 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही तेही राजेंना सांगितलं”, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मनोज जरांगे काय-काय म्हणाले?
“राजेसाहेबांनी शब्द दिलाय की, मी दोन दिवसाच्या आत बैठक घेतो. दुसरा शब्द दिलाय की, तुमचा एसपीसुद्धा ठेवत नाही. माझ्या माता-माऊलींवर अन्याय करणाऱ्या कुणालाही ठेवत नाही. तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो, असं उदयनराजेंनी शब्द दिलाय. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते शंभर टक्के मार्ग काढतील”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
“राजे साहेबांनी सांगितलं की, एसपींना घालवतो. त्यांनी माता-माऊलींना मारलं आहे. तुमचे गुन्हेही मागे घ्यायला लावतो. तुमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावतो. त्यामुळे आम्ही जनता राजेंवर खूश आहोत. आमचा प्रश्न मार्गी लावावा. आमचे देवच राजे आहेत. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. राजेंच्या विश्वासावर बैठक लागली तर आम्ही जाणार. सरकारने त्यांचं नाही ऐकलं तरी आम्ही राजेंवर नाराज होणार नाहीत. पण आंदोलन सुरु ठेवणार’, असंही ते म्हणाले.
‘बॉम्ब टाकला तरी…’
“शरद पवार यांनी सल्ले दिले नाहीत. त्यांनी आमची विचारपूस केली. त्यानंतर ते बोलले. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही आमचं ठरवलेलं आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सुट्टी नाही. बॉम्ब टाकला तरी हरकत नाही. पण मी आरक्षणच घेणार”, असं मोठं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं.
“आमच्या भेटीसाठी उदयनराजे आले. शरद पवार आले. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील येणार आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील येणार आहेत. आमची दखल घेतली जात असल्याने आनंद आहे. पण आमच्या एका डोळ्यात अश्रू आहेत. आम्हाला एकीकडे बेछूट मारलंय. त्यामुळे आमच्याकडे बोलायला शब्द नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.