Maratha Reservation : आरक्षण देण्यासाठी किती दिवस लागणार? सरकारची भूमिका आली समोर
Maratha Reservation : मराठा समाजला तात्काळ आरक्षण द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे. त्यासाठी ते आज संध्याकाळी आणखी एक मोठा निर्णय घेऊ शकतात. पण आरक्षणासाठी किती वेळ लागेल? त्यासंबंधी टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
जालना : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आजपासून ते आपल्या आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार आहेत. सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. संध्याकाळी 5 नंतर मनोज जरांगे पाटील पाण्याचा त्याग करणार आहेत. सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाच्या मागणीवर ठाम आहेत. चर्चेशिवाय मार्ग नाही हे आम्हाला समजतं. पण, नुसत्या चर्चा करुन अंत पाहू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आरक्षणा संदर्भात सरकारची भूमिका समोर आली आहे. टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तात्काळ अध्यक्षादेश काढावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. पण एका दिवसात आरक्षण शक्य नाही, अशी सरकारची भूमिका आहे. एका दिवसात आरक्षण शक्य नाही. आरक्षणासाठी 30 दिवसांचा कालावधी लागणार. एका दिवसात काढलेला आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यातील ही भूमिका आहे. गिरीश महाजन, संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांचं शिष्टमंडळ आज मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहे. आरक्षणासाठी 30 दिवसांचा वेळ द्यावा, यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात येईल. सरकारकडून 15 दिवसात कुणबीचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्राच्या सॉलिसिटर जनरलशी चर्चा
30 दिवसात आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. यासंबंधी सरकारने केंद्राच्या सॉलिसिटर जनरलशी चर्चा केल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली, ती विश्वासनीय सूत्रांनी tv9 मराठीला माहिती दिली. दरम्यान जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. शहराच्या दसरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बंदच्या आवाहनासाठी दहा वाजता दसरा चौकात जमू शकतात.