Manoj jarange Patil | प्रकृती खालावली, स्पष्ट बोलताही येत नसताना मनोज जरांगे पाटील म्हणाले….
Manoj jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याच त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसतय. त्यात ते डॉक्टरकडूनही उपचार घेत नाहीय. या अशा अवस्थेत त्यांनी मराठा समाजाला महत्त्वाच आवाहन केलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची रुपरेषा काय असणार? ते त्यांनी सांगितलं.
जालना (संजय सरोदे) : “मी मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही. पण आरक्षणासाठी कोणीही जीवन संपवू नका, ही मी हातजोडून विनंती करतो. सरकारने गांभीर्याने घ्यावं. तुमच्या कोणत्या नातलगासोबत असं झालं, तर रात्रभर झोप येणार नाही. लोकांची लेकर मरत असताना मजा बघू नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी सोडलय. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. शरीरात ताकत नाहीय, हे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होतं. स्पष्टपणे बोलणही त्यांना जमत नाहीय. मनोज जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यायला नकार दिलाय. “सरकारने हे सहजतेने घेऊ नये, त्यांना जड जाईल. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “माझी मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी आत्महत्या करु नये तसच इतर कोणालाही जीवन संपवायला देऊ नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“कोणीही उग्र आंदोलन करु नका, शांततेत आंदोलन करा. आपल्या गावात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने यायचे नाही आणि आपणही कोणत्या नेत्याच्या दारात जायचे नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “उद्या 29 पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरु होईल. पाणी घेऊन उपोषण करा. गावची गावं, उद्या एकजुटीने एकत्र बसा. आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा समाज बसणार आणि हे देशातील मोठे आंदोलन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 तारखेला ठरणार” अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. “सर्व उपोषणाला बसल्यानंतर कोणाच्या जीवाला धोका झाला, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सरकारची जबाबदारी असेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. स्वत:च्या प्रकृतीबद्दल मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, “पाणी पोटात नसल्याने त्रास होतोय. पण माझ्यापेक्षा मुलांचा त्रास मोठा आहे” “त्यांचं करीयर उद्धवस्त होतय. माझ्यापेक्षा माझ्या समाजाला होणारा त्रास मोठा आहे. त्यामुळे मी माझ्या त्रासाचा विचार न करता माझ्या समाजाच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल ते पाहतो” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आज सहा वाजेपर्यंत दिलेल्या प्रश्नांची वाट पाहत आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन सरकारने प्रामाणिक पणा दाखवावा. नाही तर सरकार धोका देत आहे, मराठा समाज नाराज होईल. मला अजूनही सरकाच्या वतीने फोन किंवा निरोप मिळालेला नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.