Jalna lathi charge | ’10 टाके पडले, पूर्ण कुटुंबाला मारलं, लहान मुलांनाही सोडलं नाही’, महिलेची शरद पवार यांच्याकडे तक्रार
Sharad Pawar in Jalna | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जालना जिल्ह्यात गेले आहेत. जालन्यात काल मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून भीषण लाठीचार्ज करण्यात आला होता. या लाठीचार्जवर जखमी झालेल्या महिला आणि पुरुषांची शरद पवार यांनी भेट घेतली.
जालना | 2 सप्टेंबर 2023 : मराठा आंदोलकांवर काल जालन्यातील अंतरवली सराटी गावात पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये 100 पेक्षा जास्त मराठा आंदोलक आणि कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी महिलांनाही अमानुषपणे मारहाण केलीय. त्यामुळे महिलाही या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आज जालना जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी अंबड येथील रुग्णालयात दाखल होऊन जखमींची विचारपूस केली.
यावेळी जखमी आंदोलकांनी काल घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. पोलिसांनी लहान मुलं, महिला कुणालाही सोडलं नाही. साहेब, आम्ही माळकरी माणसं आहोत. आमच्यावरी लाठीचार्ज केला, अशी तक्रार एका जखमी आंदोलकाने शरद पवार यांच्याकडे केली. या आंदोलकाच्या पत्नीलाही भीषण मारहाण करण्यात आलीय. या महिलेची देखील शरद पवार यांनी विचारपूस केली. आपल्याला 10 टाके पडल्याची माहिती महिलेने यावेळी शरद पवारांना दिली.
महिलेने शरद पवारांना नेमकं काय सांगितलं?
“व्याख्यान सुरु होतं तर आम्ही व्याख्यान ऐकत होतो. पोलीस आले ते आम्हाला मनोज पाटलांना भेटायचं आहे, असं म्हणाले. ते शांततेत गेले. त्यानंतर लगेच लाठीचार्ज सुरु केला. आमच्या घरातल्या पाच जणांना मारलं. घरातल्या लहान मुलांनाही मारहाण केली”, अशी तक्रार महिलेने शरद पवार यांच्याकडे केली.
‘प्लॅनिंग करुन मारलं’, आंदोलकाची पवारांकडे तक्रार
अंबड जिल्हा रुग्णालयात 9 ते 10 जखमींना दाखल करण्यात आलं आहे. या प्रत्येक जखमींची यादी शरद पवार यांच्याकडे आहे. या रुग्णालयानंतर ते वडी गोदडी येथील रुग्णालयात जाणार आहेत. तिथे महिला आंदोलकांना दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, हे सगळं प्लॅनिंग करुन मारलं. कुणाचा तरी फोन आला त्यानंतर लाठीमार केला, अशी तक्रार एका जखमी आंदोलकाने शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील अंबड जिल्हा रुग्णालयात आले होते.