रस्त्यावर 200 ची नोट, खाली वाकला अन् पाहता पाहता 9 लाख रुपयांची बॅग… बदनापुरात काय घडलं?
मोटरसायकलवरून 9 लाखांची पिशवी चोरणाऱ्या आरोपींनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे चट्टे यांना ते ओळखता आले नाहीत. सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालनाः रस्त्यावर एखादी दहा-वीस रुपयांनी नोट टाकून एखाद्याला फसवल्याचं किंवा त्याची खिल्ली उडवल्याचे प्रकार अनेकदा चित्रपटांमधून दाखवण्यात आलेले आहेत. तसाच प्रकार करून भर दिवसा व्यापाराला लुटल्याचा (Badnapur Robbery) प्रकार जालना जिल्ह्यातील (Jalna Crime) बदनापूर तालुक्यात घडलाय. 9 लाख रुपयांची बॅग घेऊन निघालेल्या व्यापाऱ्यावर चोरट्यांनी अशी काही पाळत ठेवली, त्याचा पाठलाग केला आणि ऐन मोक्याच्या ठिकाणी त्याच्यासमोर दोनशे रुपयांची नोट टाकली. बदनापुरात घडलेला हा प्रकार संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ उडवून देणारा ठरला. या प्रकरणी पोलिसात (Jalna robbery) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या घटनेतील चोरट्यांचा शोध घेत आहेत, मात्र ज्याची बॅग लंपास करण्यात आली त्या व्यापाराने सांगितलेली आपबितीही धक्कादायक आहे.
कसा घडला नेमका प्रकार?
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली. येथील जनार्दन बाबूराव चाटे हे कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. गावा-गावांतला कापूस शेतकऱ्याकडून खरेदी करून बदनापूर येथील धोपटेश्वर रस्त्यावर असलेल्या श्री जी जिनिंगमध्ये विकतात. कापूस विक्रीचे पैसे बँकेतून काढण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र नरेश फटाले हे दोघे बँकेत गेले. खात्यातील 9 लाख रुपये बँकेतून काढून कापडी पिशवीत टाकले. ही पिशवी मोटरसायकलच्या हँडलला टांगून अडीच वाजेदरम्यान बदनापूरला आले. मित्र नरेश फटाले यांना औषधी घ्यायची असल्याने फिर्यादीने त्यांना मेडिकलवर सोडले. स्वतः चेक घेण्यासाठी जिनिंगकडे निघाले असता धोपटेश्वर चौकाजवळ जाताच पाठीमागून दोघेजण दुचाकीवर आले आणि जनार्दन चट्टे यांना थांबवले. तुमचे पैसे खाली पडले, असे सांगितले. चट्टे यांनी मोटरसायकल थांबवली. खाली उतरून रस्त्यावर पडलेल्या दोन शंभरच्या नोटा खिशात घातल्या. तोपर्यंत या दोघांनी चट्टे यांच्या मोटरसायकलवर असलेली कापडी पिशवी पळवली.
हेल्मेटमुळे आरोपींना ओळखणे अवघड
दरम्यान, मोटरसायकलवरून 9 लाखांची पिशवी चोरणाऱ्या आरोपींनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे चट्टे यांना ते ओळखता आले नाहीत. सदर प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे करत आहेत. मात्र बदनापूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या धोपटेश्वर चौकाजवळच भर दिवसा हा प्रकार घडल्याने बदनापूरसह जालन्यात खळबळ माजली आहे.
इतर बातम्या-