शरद पवार यांची अप्रत्यक्षपणे मोठी मागणी, देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्यात जावून मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी सर्व घटनाक्रम जाणून घेतला. तसेच त्यांनी जखमी आंदोलकांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली.
जालना | 2 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यात काल मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जनंतर शरद पवार आज जालन्यात गेले. त्यांनी जखमी आंदोलकांची रुग्णालयात जावून विचारपूस केली. तसेच त्यांनी अंतरवाली सराटी गावात जावून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मोठी मागणी केली.
“आंदोलकांवर बळाचा वापर केला”, असं शरद पवार म्हणाले. “गोवारी प्रकरणात आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आताच्या घटनेच्या वेळी जे गृहमंत्री आहेत त्यांनी जबाबदारी ओळखावी”, असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी केली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आता देवेंद्र फडणवीस नेमकी काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवार पत्रकार परिषदेत काय-काय म्हणाले?
अंतरवाली सराटीला जे झालं त्याची माहिती मला आणि जयंत पाटील यांना मिळाली. जो काही घडलेला प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची दखल घेतली पाहिजे. संकटात असलेल्या लोकांना दिलासा दिला पाहिजे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित राहणार नाही. कदाचित महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी आणि जयंत पाटील यांनी लवकरात लवकर यावं असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही इथे येण्याचं ठरवलं
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस कमी आहे. पाण्याच्या जलाशयांची स्थिती वाईट आहे. सर्व धरणांमध्ये अपुरा पाण्याचा साठा आहे. त्यामुळे काय संकट येणार आहे याची कल्पना आहे. त्यासंबंधी आम्ही कार्यक्रम घेणार होतो. पण त्याआधी ही घटना घडली.
आम्ही जखमींना भेटलो. आम्ही आश्चर्यचकीत झालो की अशाप्रकारे बळाचा वापर केला गेला. लहान मुलं. महिलांना बघितलं नाही. हवा तसा बळाचा वापर केला. चर्चा चालू होती, अधिकारी आमच्याशी बोलत होते. त्याच्यातून काही मार्ग निघेल असं चित्र होतं. पण एकदम पोलीस फौज मोठ्या प्रमाणात बोलवण्यात आली. जखमी लोकं सांगत होते, सर्व व्यवस्थित सुरु असताना कुठून तरी एक फोन आला आणि दृष्टीकोन बदलला.
बळाचा वापर करुन सरळ लाठीहल्ला सुरु झाला. त्यानंतर हवेत गोळीबार केला. छोटे छर्रेंच्या माध्यमातून गोळीबार केला. काही जखमींच्या हातावर छर्रे आहेत. ते छर्रे ऑपरेशन करुन काढले, अशी माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या पद्धतीची वागणूक दिली त्याचा प्रत्यक्ष अनुभव पाहिला. आम्ही आंदोलनस्थळी भेट दिली. त्याठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने तरुण दिसले. मनोज जरांगे पाटील यांच्याशी विचार विनिमय केला. त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली. आम्ही त्यांना आग्रह केला की, तुमच्या पक्षासंबंधी आम्हाला माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारमध्ये जयंत पाटील मंत्रिमंडळात होते. या मंत्रिमंडळाने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय कोर्टाने टिकला नाही. त्यानंतर सरकार बदललं.
भाजप सरकारने काय केलं त्याविषयात मी जाऊ इच्छित नाही. मनोज यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना हे माहिती होतं. आम्हाला मार्ग हवा, त्याशिवाय आमचं आंदोलन सुरु राहील असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना एक गोष्ट सांगितली की, त्यांच्याबद्दल समाजात आस्था आहे. आस्था असलेलं आंदोलन कधीही हाताबाहेर जाऊ देऊ नये. म्हणून हे आंदोलन शांततेने चालू ठेवा. राज्य सरकार आणि तुमचं बोलणं झालं तर त्यातून मार्ग निघत असेल तर आंदोलन थांबवण्याचा योग्य विचार करा.
काही ठिकाणी चाक पोटवली, बसच्या गाडीला आग लागली, कायदा हातात घेण्याचं काम करु नये. मनोजने सांगितलं की आम्हाला कायदा हातात घेण्याची अजिबात इच्छा नाही. तिथे असलेल्या सर्वांनी सांगितलं की, कायदा हातात घेण्याचं काम आम्ही केलंच नाही. इथे चर्चा सुरु असताना, चर्चेवर मार्ग निघत असल्याचं दिसत असताना पोलीस या ठिकाणी आले आणि लाठीहल्ला झाला. त्यामध्ये स्त्री-पुरुष न बघता सरसकट मारहाण केली गेली. याबाबतची जबाबदारी ज्यांनी निर्णय घेतला त्यांची आहे.