तर 5 लाख ओबीसी जनता जालन्याला येईल; बबनराव तायवाडे यांचा इशारा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे असं आम्ही नेहमी सांगत आलो आहोत. सरसकट हा शब्द मात्र योग्य नाही, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. आम्ही आपल्या हक्कासाठी संघर्ष करतोय मग त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये, त्यांनी आम्हाला विरोधक समजू नये आम्ही त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला विरोध केलेला नाही असे बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 16 नोव्हेंबर 2023 : जरांगे पाटीलांची भाषा वेगळ्या पद्धतीची आहे. 70 वर्षांपासून त्याचं आरक्षण कोणी हिसकावलेले नाही. आरक्षण या देशात संविधानानूसार दिलेले आहे. कोणी जर म्हणत असेल तुम्ही लुटले तर ते बरोबर नाही. ओबीसी समाजाच्या सभा सुरु होणार आहेत. मोर्चे देखील होणार आहेत. आमचे नेते एकत्र येऊन आपल्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी रस्त्यार येत आहेत हे लक्षात घ्यावे, आमच्या अनेक कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. आम्ही आपल्या हक्कासाठी संघर्ष करतोय त्यामुळे धमक्या देऊ नयेत. ओबीसी समाज एकत्र येत असून जालन्यातील अंबड येथील उद्याच्या मेळाव्याला पाच लाख लोक येतील अशी अपेक्षा असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.
ओबीसींना संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालेले आहे. ओबीसीची संख्या 52 टक्के आहे. मात्र 50 टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नाही, म्हणून ओबीसीला केवळ 27 टक्के आरक्षण मिळाले आणि ते आम्ही कोणाचं हिसकावलेले नाही किंवा अतिक्रमण केलेले नाही असेही बबनराव तायडे यांनी म्हटले आहे. आरक्षणासंदर्भात अनेक आयोगांनी काम केलेले आहे त्या संदर्भातील यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानुसार आरक्षण देण्यात आला त्यामुळे कोणी जर म्हणत असेल की तुम्ही लुटलं ते म्हणणं योग्य नाही असे तायडे यांनी सांगितले आहे.
धमक्या आलेल्यांना संरक्षण द्यावे
आम्ही आपल्या हक्कासाठी संघर्ष करतोय मग त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये, त्यांनी आम्हाला विरोधक समजू नये आम्ही त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला विरोध केलेला नाही. त्यांनी आपली मागणी सरकार पुढे मांडावी त्यांची मागणी कशी सोडवायची तो सरकारचा प्रश्न आहे असेही तायडे यांनी म्हटले आहे. दोन समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून संघर्ष करणाऱ्या नेत्यांना धमक्या देण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना धमकी आली आहे. काहींना लिखित स्वरूपात सुद्धा धमक्या आल्या आहेत. या धमक्यांमुळे जर काही नेत्यांना असुरक्षित वाटत असेल आणि त्यांनी जर सरकारकडे सुरक्षेची मागणी केली असेल तर त्यांना संरक्षण देण्यात यावं असे तायडे यांनी म्हटले आहे.
सरकारला वेळ द्यावा
सरकारने त्यांना वेळ मागितला. यांनी सरकारला वेळ दिला मात्र त्या टाईम बाऊंड मध्येच ती मागणी पूर्ण होईल हा अट्टाहास करणं योग्य नाही. कारण सरकारपुढे सुद्धा अनेक पेच असतात त्या सगळ्या बाबी तपासाव्या लागतात त्यानंतर त्याचा विचार होत असतो असे तायडे यांनी म्हटले आहे. आंदोलन कर्ते आणि सरकारमध्ये संवाद असायला हवा, संवाद असल्याशिवाय प्रश्न सुटत नाही एकतर्फी निर्णय होत नाहीत. सरकार वारंवार सांगते आहे की आम्ही तुमच्या आरक्षणाप्रती सरकार कटिबद्ध आहे, मुख्यमंत्र्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे त्यामुळे त्यांनी धीर धरायला हवा असेही तायडे यांनी म्हटले आहे. आम्ही निश्चिंत आहोत, कारण सरकारने आम्हाला शब्द दिला आहे. आम्ही ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहोत, आम्ही आता एकजुटीने सगळे ओबीसी काम करत आहोत असेही त्यांनी सांगितले.