जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी तिघांना अटक, सरकारची भूमिका काय?
अंतरवाली सराटीतल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आता तिघांना अटक केलीय. पुराव्याच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर गुन्हे मागे घेणार होते, मग आता अटक सुरु झाली, सरकारचा कोणता डाव? असा सवाल मनोज जरांगेंनी केलाय.
जालना | 25 नोव्हेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली होती. अंतरवाली सराटीतल्या या दगडफेक प्रकरणात अंबड पोलिसांनी तिघांना अटक केलीय. ऋषिकेश बेदरे, शनिदेव शिरसाट आणि कैलाश सुखसे अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांवर कलम 307- जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, कलम 332 आणि 333 – सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, कलम 353- सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 427- सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, अशी कलमं लावण्यात आलीत. अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश बेदरेकडून गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आलीय.
जरांगे पाटलांनी या अटकेवरुन सरकारला सवाल केले आहेत. आधी गुन्हे मागे घेणार असं म्हणाले होते. आता अटक सुरु झाली. सरकारचा कोणता डाव आहे? असं जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. मात्र आधी दगडफेक झाली, त्यामुळेच लाठीचार्ज झाल्याचा दावा तत्कालीन जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी केला होता. तर त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दगडफेकीमुळेच लाठीचार्ज झाल्याचं म्हटलं. मात्र नंतर आपण नीट माहिती घेतल्यावर पोलिसांकडून चुकीचंच घडलं, असं फडणवीसांनी tv9च्या मुलाखतीत म्हटलं होतं.
‘पोलीस दबावाला बळी पडणार नाही’, अजित पवारांचं वक्तव्य
आता पुराव्यांच्या आधारे तिघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केलीय. जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु होतं. मात्र 1 सप्टेंबरला पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. मात्र दगडफेक झाल्यानंच पोलिसांनी नाईलाजास्तव लाठीचार्ज केल्याचं भुजबळांनी वारंवार म्हटलंय. पण आता पोलिसांनी कारवाई सुरु केलीय. तिघांना पोलिसांकडून अटक झालीय. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलीस दबावाला बळी पडणार नाही, असं म्हटलंय.
जरांगे पाटलांचा रोख छगन भुजबळांवर
तर इकडे अजित पवारांनी जरांगे आणि भुजबळांच्या शाब्दिक चकमकीवरुन नाव न घेता टोला लगावलाय. वाचाळवीरांची संख्या वाढली असून अरेला कारे सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटलांनी तुमच्याच माणसाला रोखा म्हणजे, असं म्हटलं आहे. याचा अर्थ म्हणजे जरांगे पाटलांचा रोख छगन भुजबळांवरच आहे.