राजकीय नेत्यांची अंतरवाली सराटीची वारी; मनोज जरांगेंसोबत गुप्त खलबतं, भोकरदन, परळी मतादरसंघात उलथापालथ होणार?
Maharashtra Vidhansabha Election 2024 : अंतरवाली सराटी सध्या राजकीय घडामोडींचं केंद्र ठरलं आहे. अनेक नेते अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. मराठा फॅक्टरचा झटका लोकसभेत दिसल्यापासून महायुतीचे नेते पण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत. त्यातच या दोन मतदारसंघात मोठा उलटफेर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंतरवाली सराटी राज्याच्या राजकीय आखाड्याचं केंद्रबिंदु ठरलं आहे. अनेक नेत्यांची पावलं अंतरवाली सराटीकडे वळली आहेत. लोकसभेत मराठा फॅक्टरचा प्रभाव दिसून आला. विशेषतः मराठवाड्यात त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. त्यामुळे विधानसभेत मराठा समाजाचं गणित बघता महायुतीतील काही नेत्यांनी अंतरवाली सराटीची वारी केली आहे. तर बीड जिल्ह्यातील सत्ता समीकरणं बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे (Bhokardan Constituency) माजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पण अंतरवालीत हजेरी लावली. त्यामुळे या ठिकाणी मोठा उलटफेर तर होणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
या मतदारसंघात मोठा उलटफेर होण्याची शक्यता?
बीड जिल्ह्यात मराठा फॅक्टरचा परिणाम लोकसभेत दिसून आला. बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात अटीतटीच्या लढतीत विजयाची माळ पडली. बीडमध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. बीड, केज, परळी, आष्टी, माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात यंदा महाविकास आघाडी सुरूंग लावण्याची शक्यता आहे. त्यात परळीवर सध्या जास्त लक्ष आहे. तर दुसरीकडे जालना लोकसभा निवडणुकीत कल्याण काळे हे जायंट किलर ठरले. त्यांनी भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. आता त्यांचा मुलगा संतोष दानवे याला भाजपने भोकरदनमधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर माजी आमदार चंद्रकांत दानवे काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते. त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय म्हणाले मेहबूब शेख
मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला येत असतात. जरांगे पाटील यांनी काय भूमिका घ्यावी हे सांगण्या इतपत मी मोठा नाही. मनोज जरांगे यांना सगळ्या गोष्टीच ज्ञान आहे, त्यांची मराठा आरक्षणाची मागणी आहे त्या अनुषंगाने ते निर्णय घेत असतात. जरांगे यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लिम समाजाची मागणी लागून धरल्याची प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी दिली.
पुण्यात 5 कोटी कॅश सापडल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश कुठून आली, झाडी डोंगर, हॉटेल इथले काही ते पैसे असावेत. आचारसहिता लागल्यानंतर खोक्याच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. ही एक त्याची छोटीशी झलक आहे ही अमाऊंट फार छोटी आहे 50 खोके 60 खोके दिसतील. लोकसभेत जसा त्यांनी पैशाचा पाऊस आणला तसाच पाऊस ते विधानसभेत देखील आणतील, असा आरोप शेख यांनी केला.