जालन्यातील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला कडवं चॅलेंज, नेमकं राजकीय गणित काय?
जालना लोकसभेनंतर आता जालना लोकसभेत येणाऱ्या सहा विधानसभांचं गणित काय आहे? आगामी विधानसभेचं चित्र काय असेल? कोण-कोण इच्छूक आहेत, याबाबतचमी माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट!
जालना लोकसभेत जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण विधानसभांचा समावेश येतो. जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंटियाल आमदार आहेत. बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे, भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे, सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे, आणि पैठणमधून शिंदे गटाचे संदिपान भुमरे. विधानसभांचं बलाबल बघितल्यास जालना लोकसभेत महायुतीकडे बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण असे ५ आमदार, तर मविआकडे जालन्याचे एकमेव काँग्रेसचे आमदार होते. मात्र तरीही काँग्रेसच्या कल्याण काळेंना 6 लाख 7 हजार 897 मतं , तर विरोधातल्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना 4 लाख 97 हजार 939 मतं पडली. काँग्रेसच्या काळेंचा १ लाख 9 हजार 958 मतांनी विजय झाला.
लोकसभेचा हा निकाल महायुतीसाठी विधानसभेच्या दृष्टीनं डोकेदुखी वाढवणारा आहे, कारण आमदार-स्थानिक सत्ताकारण आणि राज्याचं सरकार हाती असूनही महायुतीचा एकही आमदार भाजपच्या दानवेंना लीड देवू शकलेला नाही. भाजप आमदार नारायण कुचेंच्या बदनापुरातून काँग्रेसला 13 हजार 742 चं लीड मिळालं. भाजप आमदार आणि रावसाहेब दानवेंच्याच पुत्राचा मतदारसंघ भोकरदनमधून काँग्रेसला 962 मतांची आघाडी मिळाली. भाजप आमदार हरिभाऊ बागडेंच्या फुलंब्रीतून काँग्रेसला 29 हजार 856 चं लीड, शिंदेंचे आमदार सत्तारांच्या सिल्लोडमधून काँग्रेसला 27 हजार 759 चं लीड, शिंदेंचे आमदार संदिपान भुमरेंच्या पैठणमधून 27 हजार 856 ची आघाडी आणि काँग्रेस आमदार गोरंटियाल यांच्या जालन्यातून 9790 ची काँग्रेसला आघाडी मिळाली.
2019 च्या तुलनेत दानवेंचा किती मतांच्या टक्क्यांनी पराभव?
भाजपच्या रावसाहेब दानवेंच्या २०१९ च्या तुलनेत किती दारुण पराभव झाला? हे आकडेवारीनं समजून घेऊ. 2019 ला जालन्यात दानवेंना 41 हजार 815 चं लीड होतं. यंदा साडे 9 हजारानं पिछाडीवर गेल्यावेळी बदनापुरात 60 हजार 299 चं लीड होतं. यंदा त्याच बदनापुरात साडे 13 हजारांची पिछाडी, भोकरदननं 54 हजार 384 ची आघाडी दिली होती, यंदा 962 मतांची पिछाडी, सिल्लोडमधून दानवेंना तब्बल 79 हजार 831 चं लीड होतं, यंदा 27 हजारांनी मागे पडले. फुलंब्रीत 52 हजार 860 चं लीड होतं, यंदा 29 हजारांची पिछाडी. पैठणमध्ये साडे 41 हजारांची आघाडी होती, यंदा त्याच पैठणमध्ये साडे 27 हजारानं दानवे मागे राहिले.
थोडक्यात 2019 ला रावसाहेब दानवेंनी काँग्रेसचा तब्बल 3 लाख 64 हजार 348 मतांनी पराभव केला होता. त्याच दानवेंना यंदा तिसऱ्या स्थानी राहिलेल्या अपक्षानं १ लाख 55 हजार मतं घेवून सुद्धा काँग्रेसकडून १ लाख 9 हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला. 2019 ला दानवेंना 58.48% मतं होती. तर काँग्रेसला 30.66 टक्के. यंदा दानवेंनी 36.52% मतं घेतली आणि काँग्रेसनं 44.59%. जालन्यात यंदा भाजपच्या मतांची टक्केवारी 21.96 टक्क्यांनी घटली, तर काँग्रेसच्या टक्क्यात 13.93 टक्क्यांची वाढ झाली.
2019 च्या विधानसभेचा निकाल
2019 च्या विधानसभेवेळी जालना लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी महायुतीत भाजपनं ३ आणि शिवसेनेनं ३ जागा लढवल्या होत्या. इकडे आघाडीतही राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेस ३ जागी लढली. त्यापैकी भाजप ३, शिवसेना २ आणि काँग्रेसचा एका जागेवर विजय झाला होता. 6 पैकी 2 जागा चुरशीच्या ठरल्या. फुलंब्रीत भाजपचे हरिभाऊ बागडे 15 हजार 274 मतांनी जिंकले. इथं वंचितला 15 हजार 252, इतर एका अपक्षानं 5 हजार 327 मतं घेतली होती. पैठणमध्ये शिवसेनेचे संदिपान भुमरे 14 हजार 139 मतांनी विजयी झाले. याठिकाणी वंचितला 20 हजार 654 मतं होती.
सहा विधानसभा मतदारसंघातून कोण-कोण इच्छुक?
- आगामी विधानसभेत जालना विधानसभेत महायुतीत शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर, भाजपकडून भास्कर दानवे, मविआत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल इच्छूक आहेत.
- बदनापूर विधानसभेत भाजपकडून नारायण कुचे, मविआत शरद पवार गटाकडून बबलू चौधरी, ठाकरे गटाकडून संतोष सांबरे इच्छूक आहेत.
- भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे, तर मविआत शरद पवार गटाकडून चंद्रकांत दानवेंचं नाव चर्चेत आहे.
- सिल्लोड विधानसभेसाठी शिंदे गटाकडून पुन्हा अब्दुल सत्तार, भाजपकडून सुरेश बनकर, सुनिल मिरकर, कमलेश कटारिया, महेश शंकरपल्ली तर काँग्रेसकडून प्रभाकर पालोदकरांचं नाव चर्चेत आहे.
- फुलंब्रीत भाजपकडून हरिभाऊ बागडे, रामूकाका शेळके, अनुराधा चव्हाण विजय औताडे, शिंदे गटाकडून किशोर गलांडे, रमेश पवार…तर काँग्रेसकडून विलास औताडे इच्छूक आहेत.
- पैठण विधानसभेत शिंदे गटाकडून विलास भुमरे, भाजपकडून सुनिल शिंदे, अजितदादाकडून विजय चव्हाण, ठाकरेंकडून दत्ता गोर्डे, मनोज पेरे, तर शरद पवारांच्या पक्षाकडून संजय वाकचौरे यांची नावं इच्छूक म्हणून पुढे आली आहेत.