‘घिसडघाईने फिर्याद नोंदवली, आमचा त्या कलमांवर तीव्र आक्षेप’, जयदीप आपटे याच्या वकिलांचा मोठा दावा
"शासनाकडून पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर समिती नेमली जायला हवी होती. पुतळ्याच्या अवशेषांचा अभ्यास करुन समितीने अहवाल तयार केल्यानंतर ठपका ठेवला असता की, जयदीप आपटे यांनी पुतळा बनवला त्यामध्ये दोष होते, ऋुटी होत्या, वगैरे वगैरे. तथ्यांचा अहवाल न घेता घिसळघाईने फिर्याद नोंदवली जाते हे केवळ जनतेचा क्षोभ झाला होता तो शांत करण्यासाठी ही फिर्याद नोंदवली गेली आहे", असा दावा जयदीपच्या वकिलांनी केला.
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. याच प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटे याला काल त्याच्या कल्याण येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. यानंतर दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर जयदीप आपटेच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
“नेवल डॉकयार्डने टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाळून शिल्पकाराला दिलं होतं. कायदेशीररित्या सक्षम कागदपत्रे आहेत. पुतळा कोसळल्याबद्दल शासनातर्फे, पीडब्ल्यूडी तर्फे असिस्टंट इंजिनियरने घटना घडल्यानंतर दहा तासात तातडीने फिर्याद नोंदवली होती. मागच्यावर्षी याच सुमारास मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक नव्हे तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा, मूर्ती म्हणा, प्रतिमा म्हणा, विविध देवतांच्या प्रतिमा या देखील विविध कारणांमुळे पडल्या. तिथल्या सरकारने लोकायुक्ताकडे मूर्त्या कशा कोसळल्या याचा सखोल तपास करण्याची जबाबदारी सोपवली”, असं जयदीपच्या वकिलांनी सांगितलं.
‘घिसडघाईने फिर्याद नोंदवली’
“इथे अत्यंत घिसडघाईने जे व्यक्ती केवळ असिस्टंट इंजिनियर आहे, ज्याला मेटलरजीमधील कोणतही ज्ञान नाही. आम्ही त्यांच्या सिविल इंजिनियर ज्ञानाचा आदर करतो. पण मेटलरजिचं ज्ञान नाही. केवळ दुपारी त्याने घटना घडल्यानंतर भेट दिली, आठ तासांमध्ये त्यांनी फिर्याद नोंदवली त्यामध्ये शिल्पकार जयदीप आपटे याला आरोपी केलं आणि डॉ. चेतन पाटील ज्यांनी चौथाऱ्याच्या संदर्भात डिझाईन दिलं, त्यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदवली गेली”, असं वकील म्हणाले.
‘आम्ही त्या कलमांवर तीव्र आक्षेप घेतला’
“या प्रकरणात शारीरिक इजा संदर्भातील कलम आहेत, पुतळा कोसळल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा पर्यटकाला इजा पोहोचलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात चुकीचे कलमं जोडली गेली आहेत. शारीरिक चूक झाल्याचं कुठेच फिर्याद बोलत नाहीय. त्यामुळे आम्ही त्या कलमांवर तीव्र आक्षेप घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया जयदीप आपटे याच्या वकिलांनी दिली.
‘केवळ जनतेचा क्षोभ शांत करण्यासाठी…’
“पुतळा बनवताना सरकारने कोणत्याप्रकारे निष्काळजीपणा दाखवला, असं जास्तीत जास्त बोलू शकलो असतो जर त्यांना ठपका ठेवायचा असता. शासनाकडून पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर समिती नेमली जायला हवी होती. पुतळ्याच्या अवशेषांचा अभ्यास करुन समितीने अहवाल तयार केल्यानंतर ठपका ठेवला असता की, जयदीप आपटे यांनी पुतळा बनवला त्यामध्ये दोष होते, ऋुटी होत्या, वगैरे वगैरे. तथ्यांचा अहवाल न घेता घिसळघाईने फिर्याद नोंदवली जाते हे केवळ जनतेचा क्षोभ झाला होता तो शांत करण्यासाठी ही फिर्याद नोंदवली गेली आहे”, असा दावा जयदीपच्या वकिलांनी केला.