जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ विधानावरून भाजप आमदार भडकला, एकेरी उल्लेख करत थेट शरद पवार यांच्यावर घसरला, मग जे झाले ते…
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक हे सगळे प्रकल्प या सरकारने बासनात गुंडाळून ठेवले आहेत. या कामांना वेग यावा असे सांगतानाच महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारकही मुंबईत व्हावे...
मुंबई : विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार यांच्याकडे पाहत काही विधान केले. त्याला उत्तर देताना त्या भाजप आमदाराने शरद पवार यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याने राष्ट्रवादी आमदारांनी गदारोळ केला. त्यामुळे सभरूपातील वातावरण काही काळ बिघडले. अखेर त्या भाजप आमदाराची माफी घेऊनच राष्ट्रवादीच्या आमदारांनी पुढे कामकाज करू दिले.
नवनियुक्त राज्यपाल यांचे अभिभाषण मराठी भाषा दिनाच्या दिवशी झाले. त्या दिवशी त्यांनी आपल्या भाषणात किमान तीन ओळी तरी मराठीतून बोलणे अपेक्षित होते असा टोला लगावतानाच राज्यपाल यांनी संपूर्ण भाषण हिंदीतून केले. मंत्रिमंडळाने याचा विचार करायला हवा होता, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक हे सगळे प्रकल्प या सरकारने बासनात गुंडाळून ठेवले आहेत. या कामांना वेग यावा असे सांगतानाच महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारकही मुंबईत व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
भाषणाच्या ओघात आव्हाड यांनी भाजप आमदार राम सातपुते यांच्याकडे पाहून तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून आला आहात तो मतदारसंघ राखीव आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दिलेल्या घटनेमुळेच याची आठवण करून दिली.
आमदार आव्हाड यांच्या त्या विधानाचा समाचार भाजप आमदार राम सातपुते यांनी आपल्या भाषणातून घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली म्हणून आम्ही आहे. मात्र, त्यापुढे त्यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये धाव घेतली.
विधानसभा अध्यक्ष यांनी हे भाषण तपासून पाहिले जाईल असे सांगितले. त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. अध्यक्षांनी वक्तव्य तपासून सांगेपर्यंत असा नवीन पायंडा आपण तयार करता आहात का असा सवाल त्यांनी केला.
आमदार राम सातपुते जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी भूमिका घेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. यामुळे कामकाज करणे कठीण झाले. विधानसभा अध्यक्ष यांनी राम सातपुते यांना माफी मागण्याची सूचना केली.
अखेर आमदार राम सातपुते यांना जाहीर माफी मागितली. त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या दोन्ही आमदारांच्या माफीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांचे विधान पटलावरून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी ते विधान पटलावरून काढत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार शांत झाले आणि सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.