भिवंडीत ‘म्हाडा’ 20 हजार घरांची उभारणी करणार, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरं आहेत. भिवंडी पालिका प्रशासनानं भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करेल, असं आव्हाड यांनी म्हटलंय.
भिवंडी : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी उशिरा भिवंडी महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरं आहेत. भिवंडी पालिका प्रशासनानं भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा 20 हजार घरांची उभारणी करेल, असं आव्हाड यांनी म्हटलंय. (MHADA to build 20,000 houses in Bhiwandi, announcement of Jitendra Awhad)
भिवंडी महापालिका क्षेत्रात शेकडोच्या संख्येने धोकादायक आणि अनधिकृत इमारती उभ्या आहेत. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात अशा इमारती कोसळून दुर्घटना घडत असतात. अशा दुर्घटनेत आतापर्यंत अनेकांचा जीव गेलाय. शुक्रवारी सकाळी शहरातील आजमी नगर भागात एक अनधिकृत इमारत कोसळून त्यात एकाचा बळी गेलाय. तर सहा जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी दुर्घटनेत बळी गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत आणि त्यांच्यावरील उपचाराचा खर्च महापालिका प्रशासन करेल, असं जाहीर केलं. यावेळी पत्रकार परिषदेस महापौर प्रतिभा पाटील, उपमहापौर इम्रान वली खान ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू, भगवान टावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बिल्डरांनी रखडवलेले प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार
जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसआरएमध्ये LOI (आशयपत्र) घेतले म्हणजे तुम्ही जमिनीचे मालक होत नाही. अनेक बँकांनी, संस्थांनी LOI बघून बिल्डरांना कर्ज दिलेले आहे. खरं तर या बँकांनी पुन्हा एसआरएकडे यायला हवं होतं. बिल्डरांनी पैसे घेतले एसआरएसाठी आणि ते भलतीकडेच लावले. त्यामुळे असे जे प्रकल्प रखडले आहेत ते एसआरए ताब्यात घेईल. एसआरएच हे प्रकल्प पूर्ण करून लोकांना घरेही देईल, असं आव्हाड म्हणाले.
अधिकाऱ्यांवर कारवाई करू
हजारो लोक आज रस्त्यावर आहेत. त्यांना भाडेही मिळत नाही. त्यामुळे हे प्रकल्प म्हाडा ताब्यात घेईल. यापुढे LOI घेतल्यानंतर किती दिवसात काम करायचे याची कायद्यात तरतूद केली जाईल. जवळजवळ 50 हजार कोटी रुपये बिल्डरांनी गुंतवले आहेत. तरीही हे प्रकल्प तयार झालेले नाहीत. बिल्डरांनी LIO दाखवून कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतली आहेत, असं सांगतानाच ज्या एसआरए प्रकल्पात मूळ रहिवाशांची घरे न बांधता विक्री करण्यासाठी आधी इमारती बांधल्या असतील अशा ठिकाणी अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
इतर बातम्या :
नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार! 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्याचे आदेश
MHADA to build 20,000 houses in Bhiwandi, announcement of Jitendra Awhad