मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे एकच राजकीय माहोळ उठलं आहे. केतकीच्या या पोस्टचा सर्वच राजकीय पक्षांनी समाचार घेतला. ही पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्या अंगावर शाई फेकून तिला काळं फासण्याचाही प्रयत्न केला. कोर्टानेही तिला कोठडी सुनावली. हा सर्व गदारोळ सुरू असतानाच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी थेट केतकी चितळेला समर्थन दिलं. त्यामुळे राष्ट्रवादीचा आणखीनच संताप झाला. राष्ट्रवादीने सदाभाऊ खोत यांच्या विरोधातही जोरदार निदर्शने केली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खोत यांच्या या विधानाचा जोरदार समाचार घेत. त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खोत यांच्या हिंमत असेल तर त्यांनी केतकीचं समर्थन करून दाखावावंच, असं जाहीर आव्हानच त्यांनी केलं आहे.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त जितेंद्र आव्हाड काल घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव होत्या. यावेळी आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन केले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त उपस्थित असलेल्या सर्व आंबेडकरी जनतेला अभिवादन केले. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी खोत यांच्यावर संताप व्यक्त केला. तिने महामानव बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या बद्दल अत्यंत गलिछ लिखाण केले आहे. आंबेडकरी जनतेला नको नको ते संबोधले आहे. बरोबर कणखर आहे … तिला मानावे लागेल …. मराठ्याचे पोर कुणब्याचे पोर …म्हणजे काय सांगा? असा सवाल करतानाच हिम्मत असेल तर करा उघड समर्थन …., असं आव्हानच आव्हाड यांनी खोत यांना दिलं.
एका मुलीने 81 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल अत्यंत हीन पातळीवर भाष्य केलं. त्यांच्या मरणाची इच्छा व्यक्त केली. एखादा विकृत व्यक्तीच असं बोलू आणि लिहू शकतो. तिच्याबद्दल सदाभाऊंना राग येत नसेल. पण विकृत माणसांची ती सवय असते, अशी टीकाही त्यांनी केली.
केतकीने पहिल्यांदाच असं केलं नाही. तिने बौद्धांबद्दल अपशब्द वापरले. महात्मा फुलेंबद्दल लिहिलं. तिच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे. तरीही तुम्ही तिला कणखर मनाचे मानता? तिच्याबद्दल एवढीच कणव असेल तर शिवाजी पार्कवर एकटेच उभे राहा आणि केतकीला समर्थन असल्याचं जाहीर करा. आहे का हिंमत तुमच्यात? असा सवालही त्यांनी केला.
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात फेसबुकवर एक पोस्ट रिशेअर केली होती. या पोस्टमध्ये पवारांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी केतकीवर ठाणे, पुण्यासह 16 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक करून कोर्टात हजर केलं असता कोर्टाने तिला कोठडी सुनावली आहे.