नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांना महाराष्ट्रातील अंब्याची गोडी चाखायची संधी दोन वर्षांनंतर मिळाली आहे. मध्यंतरी असलेल्या कोरोना संक्रमणाच्या काळात राज्यातील आंबे (Mango) अमेरिकेत जाऊ शकत नव्हते. भारतातील फळांची निर्यात पुन्हा सरु झाल्यानंतर आता राज्यातील आंबे अमेरिकेत (America) खायला मिळणार आहेत. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरनजित सिंग संधू यांनी महाराष्ट्रातील आंब्याची पेटी, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली. वॉशिग्टंन डीसीत आंब्यांच्या प्रमोशनच्या एका इव्हेन्टच्या कार्यक्रमात ही पेटी देण्यात आली.
पुण्यातील रेम्बो इंटरनॅशननलच्या पॅकिंगमध्ये हे आंबे देण्यात आले आहेत. या पेटीत केसर, हापूस, गोवा मंकूर हे महाराष्ट्रातील तर हिमायत आणि बैंगनपल्ली हे आंध्रप्रदेशातील आंबे आहेत. या कार्यक्रमासाठी रेम्बो इंतरनॅशनलला भारतीय दुतावासाकडून संपर्क करण्यात आल्यानंतर हे पाच प्रकारच्या अंब्याच्या पेटी अमेरिकेत नेण्यात आली.
रेम्बो इंटरनॅशनलचे ए सी भसला यांनी सांगितले की, हे आंबे सोमवारी पॅकिंग करुन अमेरिकेला पाठवण्यात आले. भारतीय दुतावासाने हे मंगळवारी विमानतळावरुन घेतले आणि त्याचे पुन्हा एकदा पॅकेजिंग करण्यात आले. गुरुवारी ही आंब्याची पेटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुपूर्द करण्यात आली. भासला हे देशातील आंब्याचे मोठे निर्यातदार आहेत. यापूर्वी वैयक्तिक पातळीवर व्हाईट हाऊसमध्ये आंबे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पहिल्यांदाच भारताच्या प्रशासकीय पातळीवर शिष्टमंडळाच्या भेटीत त्यांच्या आंब्याच्या पेटीचा वापर करण्यात आला.
कोरोनाच्या काळातील दोन वर्षांच्या अवधीनंतर आता या वर्षी पुन्हा एकदा भारतातील आंबे अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या परवानगीनंतर हे शक्य झाले आहे. 2020 साली अमेरिकेच्या कृषी विभागाचे अधिकारी भारतात चाचणीसाठी, निरीक्षणासाठी येणे शक्य नसल्यामुळे, आंबे अमेरिकेत जाऊ शकले नव्हते. यावर्षी आंब्यांना विशेष मागणी असल्याचे आंबा निर्यातदारांनी सांगितले आहे, त्यातही केसरपेक्षा हापूसला जास्त मागणी असल्याचेही सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा.
— Supriya Sule (@supriya_sule) May 19, 2022
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी रेनबो इंटरनॅशनचं याबाबत कौतुक केलं असून ट्विटरद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘जळोची,बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा’, असं ट्वीट त्यांनी केलंय.