LOKSABHA ELECTION 2024 : ‘आजीच्या पुढे माजी लागू नये…’, श्रीकांत शिंदे यांनी दिल्या या आमदाराला शुभेच्छा
लोकसभा निवडणुकीत मी उभा राहणार आणि प्रचंड मताधिक्याने जिंकणार. जे कुणी खासदारकीची स्वप्ने पाहत आहेत ती त्यांची स्वप्ने म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' ठरू नये. स्वप्ने पाहणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा अशी टीका खासदार यांनी केलीय.
कल्याण : 3 ऑक्टोबर 2023 | कल्याण – डोंबिवली लोकसभा मतदार संघाची काळजी काही लोकांना वाटत आहे. मात्र, त्यांनी या मतदार संघाची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. हा डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमधूनच लढणार. गेल्या लोकसभेत अडीच लाखांच्या मतांनी जिंकून आला. यावेळेस तुमची भर पडलेली आहे. तुम्ही मतदार झालेले आहात. त्यामुळे तो रेकॉर्ड तोडण्यासाठी आपण सर्वांनी मदत करा असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. तसेच, आजीच्या पुढे माजी लागता कामा नये याची दक्षता घ्या असा टोलाही त्यांनी मनसेच्या आमदारांना लगावला.
डोंबिवलीचे मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माणसे कार्यकर्त्यांनी भावी खासदार असे बॅनर्स झळकावले होते. तर, राजू पाटील यांनीही खासदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलीय. पक्षाने संधी दिल्यास नक्कीच निवडणूक लढवू असे ते म्हणाले आहेत.
श्रीकांत शिंदे यांची यावरून राजू पाटील यांच्यावर टीका केलीय. काही लोकांना कल्याण लोकसभेची काळजी वाटते. मात्र, त्यांनी कल्याण लोकसभेची काळजी करायची गरज नाही. काही लोकांना मतदारसंघाची फारच चिंता पडलेली आहे. काही लोकांनी पाच वर्षात ऑफिसदेखील उघडलं नाही. लोकांना माहिती नाही कुठे जायचं. यांना भेटायला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
महाराष्ट्राला चांगले मुख्यमंत्री लाभले आहेत. मात्र, काही लोकांना रोज टीकाटिपणी करण्याची सवय लागलीय. खालच्या स्तरावर जाऊन भाषा करायची, टीका करायची सवय आहे. ही सवय इथे पण आहे. पाच वर्षे लोकांनी जबाबदारी दिली. मात्र, पाच वर्षात अजून काही कमावलं नाही. पाच वर्ष जबाबदारी दिल्यानंतर आता अजून मोठी स्वप्न पडायला लागली.
स्वप्न पडायला काही हरकत नाही. ते त्यांचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असेच आहेत. स्वप्न हे बघितलं पाहिजे मात्र असेही स्वप्न बघा की आजीच्या पुढे माजी लागता कामा नये याचीही दक्षता घ्या. माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत अशी बोचरी टीका खासदार शिंदे यांनी आमदार राजू पाटील यांचे नाव न घेता केली.