महाराष्ट्र निवडणूक 2024: कल्याण लोकसभा मतदार संघात सेना विरुद्ध सेना, कोण मारणार बाजी, वाचा ग्राऊंड रिपोर्ट
kalyan lok sabha constituency candidates: कल्याणमध्ये दोन्ही उमेदवार यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. आम्ही निष्ठावंत, आम्ही विकास काम केली, असे म्हणत उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसत आहे. मात्र नेमकं काय होणार हे चार तारखेला दिसणार आहे.
राज्यातील बारामती लोकसभा मतदार संघाप्रमाणे कल्याण लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सेना विरुद्ध सेना अशीच लढत या ठिकाणी होणार आहे. महायुतीचे उमदेवार श्रीकांत शिंदे असणार आहे. महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे.
कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार प्रत्येक वेळी खासदार म्हणून निवडून येतो. मात्र आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवार यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. तर त्यांच्यासोबत कार्यकर्ता देखील या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला दिसून येत आहे.
काय म्हणतात कार्यकर्ते
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतात, आमच्या सोबत इंडिया आघाडी आहे. जनता गद्दारांना क्षमा करणार नाही. आता जनता गद्दारांना मातीत गाढण्याचं काम करणार आहे. कल्याणमधून वैशाली दरेकर यांचा विजय निश्चित असल्याचे ठाकरे गटातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे.
शिल्लक सेनेत काहीच नाही
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास आहे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. यामुळे 50 आमदारांपैकी 40 आमदार त्यांना सोडून गेले. केवळ गद्दार बोलून लोकांना चालत नाही. लोकांना विकास पाहिजे. हा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे. देशात सर्वाधिक मते मिळवून खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जातील, असा विश्वास शिंदेच्या शिवसेनेतील कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांनी केला आहे
चार तारखेलाच स्पष्ट होणार
दोन्ही उमेदवार यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. आम्ही निष्ठावंत, आम्ही विकास काम केली, असे म्हणत उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसत आहे. मात्र नेमकं काय होणार हे चार तारखेला दिसणार आहे. कल्याण लोकसभेत खरी शिवसेना कोणाची हे चित्र त्या दिवशी स्पष्ट होणार आहे.