नाशिककरांनो शेतजमीन विकायची आहे, शासनाची एक भन्नाट योजना, काय आहे घ्या जाणून
तुम्हाला तुमची शेतजमीन विकायची आहे. त्याचा रितसर चांगला परतावा घ्यायचा आहे. त्यात कसलाही घोळ नको, असे सारे फक्त सरकार दरबारीच जमू शकते. त्यामुळेच शेतजमीन विक्रीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सरकारने एक योजना आणली आहे.
नाशिकः तुम्हाला तुमची शेतजमीन विकायची आहे. त्याचा रितसर चांगला परतावा घ्यायचा आहे. त्यात कसलाही घोळ नको, असे सारे फक्त सरकार दरबारीच जमू शकते. त्यामुळेच शेतजमीन विक्रीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सरकारने एक योजना आणली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत तुम्हाला आपली शेतजमीन थेट सरकारला विकता येईल. त्यासाठी इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
काय आहे योजना?
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबित्व कमी व्हावे या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-2005 पासून राबवण्यात येत आहे.
अशी मिळेल किंमत
जमिनीच्या दरातील वाढ लक्षात घेता, या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना पोहचविण्यासाठी जिरायत जमिनीकरिता प्रति एकर 5 लाख रुपये तर बागयती जमिनीकरिता प्रति एकर 8 लाख रुपये इतक्या कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्याबाबत 14 ऑगस्ट 2018 च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देशित केले आहे. या योजनेंर्गत उपलब्ध होणारी जमीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान तत्तवार 4 एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन उपलब्ध् करून दिली जाते.
असा करावा अर्ज
विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांना विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण नाशिक, सामाजिक न्याय भवन, बी विंग, 2 रा मजला, नासर्डी पूल नाशिक कार्यालयात सुटीचे दिवस वगळून उपलब्ध करून घेता येतील. या अर्जासोबत 7/12 उतारा, 8 अ उतारा व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाकडील मुल्यांकन पत्रक इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वरील पत्यावर किंवा दूरध्वनी क्रमांक 0253-2975800 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत तुम्हाला आपली शेतजमीन थेट सरकारला विकता येईल. त्यासाठी इच्छुक असलेल्या शेतजमीन मालकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. – सुंदरसिंग वसावे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक
इतर बातम्याः
Nashik| जिल्ह्यात 480 कोरोना रुग्ण; निफाडमध्ये 90 आणि सिन्नरमध्ये 85 जणांवर उपचार सुरू
अखेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; उद्घाटनाला मुख्यमंत्री ठाकरे अन् समारोपाला शरद पवार!