पहलगाम हल्ल्यानंतर डोंबिवलीत श्रेयवाद, बॅनरबाजीवरुन शिंदे-ठाकरे गटात जुंपली; नेमकं काय घडलं?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना मदत केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर डोम्बिवलीत लावण्यात आले. यावर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात २२ एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना राज्य सरकारकडून खास विमानाने महाराष्ट्रात आणण्यात आले. महाराष्ट्रात सुरक्षितपणे परत आणल्याबद्दल डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर झळकताना दिसत आहे. डोंबिवलीत हे बॅनर झळकल्यानंतर शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राजकीय वाद पाहायला मिळत आहे. या बॅनरबाजीमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीरमध्ये अडकले होते. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पर्यटकांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आपत्कालीन पथकाने आणि स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांनी पर्यटकांशी संवाद साधून त्यांना मदत केली. याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर शिंदे गटाने डोंबिवली शहरात लावले आहेत.
डोंबिवलीतील बॅनरवर नेमका उल्लेख काय?
पहलगाम येथील भ्याड हल्ल्यानंतर काश्मीर येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी दाखल होऊन त्यांची विचारपूस करुन पर्यटकांना धीर दिला व त्यांची काळजी घेत महाराष्ट्रात सुखरुप आणल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद. तसेच श्रीकांत शिंदे यांचे आपत्कालीन पथक व त्यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकरांनी पर्यटकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.
ठाकरे गटाची टीका
आता या बॅनरबाजीवर ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे. “काही लोकांना कुठे राजकारण करायचे हेच कळत नाही. डोंबिवलीवर शोकाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत डोंबिवलीतील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत बॅनरबाजी करणे अत्यंत दु:खद आणि घृणास्पद आहे. सरकार म्हणून हे तुमचे कर्तव्य आहे. अडकलेल्या लोकांना मदत करणे ही तुमची जबाबदारी आहे., असे दीपेश म्हात्रे म्हणाले.
विमानाची तिकिटे इतकी महाग झाली आहेत की लोकांना परत येणे शक्य होत नाही. महाराष्ट्र सरकारकडून मदत होत असल्याचा दावा खोटा आहे. तुम्ही काम केले असेल तर ते कर्तव्य म्हणून करा, केवळ दिखावा करू नका” अशी टीका दीपेश म्हात्रे यांनी केली.
आमदार राजेश मोरे यांचे प्रत्युत्तर
या टीकेला शिंदे गटाचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “कोण काय बोलतो याकडे लक्ष न देता, आम्ही कामाच्या माध्यमातूनच उत्तर देतो,” असे राजेश मोरे म्हणाले. या घटनेमुळे डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे. आता दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.