Nashik| नाशिकमधील सुप्रसिद्ध खंडेराव महाराजांच्या नवरात्रोत्सवाची उद्या सांगता…!
गंगाघाटावरील श्री खंडेराव महाराज मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात सकाळी खंडेराव महाराजांची पूजा, महाआरती, अभिषेक असे कार्यक्रम होतात.
नाशिकः नाशिकची वेगळी ओळख म्हणजे हे मंदिरांचे शहर आहे. पंचवटीत गोदामाय जिथून वाहते त्या परिसरात तुम्हाला मंदिरेच मंदिरे दिसतील. गंगाघाटावरीस सुप्रसिद्ध अशा खंडेराव महाराजांच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या शुद्ध षष्ठीला गुरुवारी कोरोनाच्या भीतीमुळे अगदी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
मंदिरातून मिरवणूक
गंगाघाटावरील श्री खंडेराव महाराज मंदिरात रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनामुळे गर्दी आणि उत्साह कमी होता. या काळात सकाळी खंडेराव महाराजांची पूजा, महाआरती, अभिषेक असे कार्यक्रम होतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठीपर्यंत हा उत्सव चालतो. यंदा येत्या गुरुवारी चंपाषष्ठी आहे. या दिवशी खंडेराव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिल्ली दरवाजातून खंडेराव महाराजांच्या पितळी टाकाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गाडगे महाराज पुलाखालून खंडेराव महाराज मंदिरापर्यंत येणार आहे.
हळदीचा भंडारा
मिरवणूक काढल्यानंतर मंदिरात देवाचा टाक स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर पूजा, महाआरती होईल. हळदीचा भंडारा उधळण्यात येईल. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा विषाणू आला आहे. त्यामुळे प्रशासन भीतीत आहे. हे पाहता खंडेराव महाराज्या नवरात्रोत्सव कार्यक्रमही फक्त काही मोजक्या भाविकांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी कोविडचे सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे, असे मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
बाजरीची भाकरी-वांग्याचे भरीत
श्री खंडेराव महाराजाला बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरीताचा नैवेद्य असतो. नाशिकमधील हे जाज्वल्य देवस्थान समजले जाते. अनेक भाविक या ठिकाणी आपला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की, खंडेरावांना बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरीताचा नैवेद्य हमखास दाखवला जातो. अनेक घरात खंडोबा हे आराध्य दैवेत असते. अनेकांच्या घरातही खंडोबाचे नवरात्र असते. ठिकठिकाणी खंडोबाची यात्रा भरते. मात्र, यंदा पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विषाणूने या यात्रांवर सावट आणले आहे.
आता तरी सुटका व्हावी…
कोरोनाच्या आगमनानंतर सर्वच धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर आणि उपस्थितीच्या संख्येवर बंधन आले आहे. त्यामुळे कोरोनाची लाट आता तरी ओसरावी. ओमिक्रॉन विषाणूचा धोका वाढू नये. सारे काही सुरळीत सुरू व्हावे, अशी प्रार्थना भाविक खंडेराव महाराजांच्या चरणाशी करत आहेत.
इतर बातम्याः
Nitin Raut: मुलासाठी महावितरणची यंत्रणा वेठीस, नितीन राऊतांनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी
OBC Reservation : ’10 महिन्यांच्या काळात राज्य सरकारनं काहीही केलं नाही, ओबीसी नेतेही जबाबदार’
Ankita Patil | हर्षवर्धन पाटील लेकीसह ‘शिवतीर्थ’वर, अंकिता पाटलांची राज ठाकरेंशी भेट