सासरच्यांनी लेकराबाळांसह घराबाहेर काढलं! 15 दिवसांचा वनवास भोगलेल्या महिलेच्या मदतीला सोमय्या धावले
कल्याणमध्ये कौटुंबिक वादातून एक विवाहित महिला तिच्या तीन मुलांसह 18 दिवसांपासून घराबाहेर राहत आहे (Kirit Somaiya help Woman).
ठाणे : कल्याणमध्ये कौटुंबिक वादातून एक विवाहित महिला तिच्या तीन मुलांसह 18 दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित महिलेच्या मदतीसाठी पाठविले आहे. पोलिसांनी आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटवला. महिलेच्या सासऱ्याने तिला आपल्यासोबत घरी राहण्यास अनुमती दिली आहे (Kirit Somaiya help Woman).
कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या मंजू यादव त्यांच्या दोन मुली आणि मुलासह पंधरा दिवसांपासून घराबाहेर राहत आहेत. तिचा सर्व सामान घराबाहेर दारात मांडून ठेवला आहे. मंजू यादव हिचा आरोप आहे की, तिचा पती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहे. त्याने अनेक दिवसांपासून तिला आणि मुलांना घराबाहेर काढले आहे. मला पतीसोबत राहायचे आाहे, असं तिने म्हटलं आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
दुसरीकडे मंजू यादव हिचे सासरे नंदलाल यांचे म्हणणे आहे की, त्यांची सून मंजू ही पतीसोबत सासू आणि सासरे यांना जाणीवपूर्वक त्रास देते. “मंजू आम्हाला मारते. आमच्या जीविताला मंजूपासून धोका आहे. आम्ही हिला भाड्याचे घर घेऊन दिले आहे. तिथे तिला राहायचे नाही”, अशी प्रतिक्रिया नंदलाल यांनी दिली.
प्रश्न असा उपस्थित होतोय आहे की, इतके सगळे होऊन देखील मंजूचा पती दीलीप यादव हा पोलिसांसमोर का येत नाही? तिने लग्न केले आहे. संसार त्याला करायचा आहे. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दखल घेतली असून त्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांना मंजूच्या मदतीसाठी पाठवले.
भाजप कल्याण शहर महिलाध्यक्ष रेखा चौधरी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, पोलीस, मंजू यादव आणि मंजूचे सासरे नंदलाल यादव यांच्यामधील चर्चेनंतर महिला मंजू यादव सासरच्या मंडळीसोबत राहणार असल्याचे ठरले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांनी दिली (Kirit Somaiya help Woman).
हेही वाचा : इचलकरंजीत एका रात्रीत पाच दुकानांवर डल्ला, पैसे, दागिन्यांसह गुटखाही लंपास