Kirit Somaiya Video: सोमय्यांनी आधी खुर्ची सोडली नंतर गाडीची काच लावली, राऊतांच्या आरोपाचं उत्तरच नाही?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रचंड अडचणीत आले आहेत.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांतप्रकरणी (ins vikrant) भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या प्रचंड अडचणीत आले आहेत. सोमय्या यांनी आज जरंडेश्वर साखर कारखान्याप्रश्नी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यापूर्वी सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. जरंडेश्वरबाबत सर्व माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राऊतांच्या आरोपांवर विचारलं. आयएनएस विक्रांतचे पैसे कुठे गेले? असा सवाल पत्रकारांनी विचारताच सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. सोमय्या तडक खुर्चीतून उठले आणि जायला निघाले. मात्र, पत्रकारांनी त्यांचा पिच्छा पुरवला. सोमय्या त्यांच्या गाडीत बसले. तेव्हाही पत्रकारांनी किरीटजी, त्या पैशाचं काय केलं? असा सवाल केला. सर सर… पैसे कुठे आहेत? राऊतांनी आरोप केला आहे… असा प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी केला. मात्र, नेहमी पत्रकारांशी तास न् तास गप्पा मारणारे आणि राऊतांचे प्रत्येक आरोप उडवून लावणाऱ्या सोमय्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. उत्तर टाळता यावं म्हणून त्यांनी गाडीची काच लावली आणि ईडीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.
किरीट सोमय्या यांनी मुलुंडच्या निलम नगरमधील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जरंडेश्वर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची माहिती देतानाच शेतकऱ्यांसोबत ईडी कार्यालयात जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विक्रांतसाठी जमा केलेल्या निधीचं काय झालं? हा निधी कुठे गेला? असा सवाल करताच सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळून खुर्चीतून उभे राहिले आणि आपल्या गाडीत बसायला निघाले. मी जरंडेश्वर प्रकरणासाठी ईडीच्या कार्यालयात जायला निघालो आहे, एवढंच ते म्हणाले. त्यानंतर सोमय्या गाडीत बसले. त्यानंतरही पत्रकारांनी आपल्या प्रश्नांचा भडिमार सुरूच ठेवला. सर सर पैसे काय केले? सर राऊतांनी आरोप केले याच कार्यालयात पैसे ठेवले होते. किरीट जी पैसे काय केले? असा आरोप केला आहे, असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. मात्र त्यावर काहीच न बोलता सोमय्या गाडीची काच लावून निघून गेले. पहिल्यांदाच सोमय्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलणं टाळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तोच प्रश्न, पुन्हा भडकले
ईडी कार्यालयात आल्यानंतर सोमय्या यांनी ईडी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून जरंडेश्वर प्रकरणाची माहिती दिली. पण यावेळी पुन्हा पत्रकारांनी त्यांना विक्रांतच्या निधीचं काय केलं? असा सवाल केला. त्यामुळे सोमय्या भडकले. मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे. तुम्ही तेच तेच काय विचारता? असा संतप्त सवाल सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी या प्रश्नावरही उत्तर न दिल्याने सोमय्या अडचणीत आलेत काय? असा सवाल केला जात आहे.
निर्लज्ज माणूस, राऊतांचा हल्ला
सकाळी सोमय्या यांनी विक्रांतच्या निधीच्या प्रश्नावरून पळ काढला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून सोमय्यांवर टीका केली आहे.किरीटजी… पैसे काय केले? उत्तर नाही. पत्रकार परिषदेतून पळून गेले. देशद्रोही. निर्लज्ज माणूस, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
संबंधित बातम्या:
जरंडेश्वरबाबत ईडी कार्याला भेट देणार, सोमय्यांचा इशारा; राऊतांकडे मागितले पुराव्याचे कागद