मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीवर टॉयलेट घोटाळ्याचा (toilet scam) आरोप केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली असून किरीट सोमय्या (kirit somaiya) पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे सोमय्यांच्या या भ्रष्टाचाराचे कागदपत्रं आहेत. त्यांनी खोटी बिलं दाखवून पैसा वसूल केला आहे. पालिका आयुक्तांचा अहवाल आपल्याकडे आहे. त्यामुळे सोमय्यांना पुन्हा एकदा अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घ्यावी लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तर, सोमय्या यांनी राऊत यांचे हे आरोप उडवून लावले होते. आरोपात काही तथ्य नाही. त्यांच्याकडे एकही कागद नाही. नेहमीप्रमाणेच त्यांनी केलेला हा आरोप आहे, असा दावा सोमय्या यांनी केली होता. मात्र, आता अचानक त्यांनी नगरविकासाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी पत्रं लिहिलं आहे. कोतीही कारवाई करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क करा, असं सोमय्या यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना पत्रं लिहिलं आहे. संजय राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने केले आहे. शौचालय घोटाळ्याचे सर्व आरोप राजकीय हेतूने केलेले आहेत. काही झालं तरी या संबंधात कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी आमच्याशी संपर्क करावा. आम्हाला विचारणा करावी, अशी मागणी सोमय्या यांनी या पत्रातून केली आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी सोमय्यांवर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला आहे. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा असून याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचं राऊत म्हणाले होते. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
भाजप हा देशभक्तांचा पक्ष आहे. देशभक्तीवर भाजप नेहमी बोलते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही त्यावर बोलत असतात. त्यामुळे आता विक्रांत घोटाळा केल्यानंतर सोमय्यांचा टॉयलेट घोटाळाही उघड झाला आहे. सोमय्यांच्या या घोटाळ्यावर फडणवीसांनी एखादं ट्विट करावं, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.
संबंधित बातम्या:
Saamana : रामाच्या नावानं तुकडे तुकडे गॅंग ! सामनामध्ये मनसे भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख
Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड