हसन मुश्रीफ प्रकरणी मोठी Update; ईडी विरोधात ‘हे’ पाऊल, ‘राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा उद्देश…’
Hasan Mushrif | हसन मुश्रीफ अखेर कागलमध्ये दाखल. ईडीच्या कारवाईविरोधात मोठं पाऊल उचलणार, काय घेतला निर्णय? उद्या मोठी अपडेट!
भूषण पाटील, कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात सुरु असलेल्या ईडी कारवाई (ED Raid) प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. शनिवारी ईडीने मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पहाटेच धाड टाकली. यावेळी मुश्रीफ घरात नव्हते. त्यांच्या घरी पत्नी आणि इतर कुटुंबीय होते. तब्बल साडे नऊ तास मुश्रीफ यांच्या घरातील कुटुंबियांची चौकशी आणि झाडाझडती चालली. मात्र तेव्हापासून हसन मुश्रीफ नॉट रिचेबल होते. आज अखेर हसन मुश्रीफ कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच ईडीच्या कारवाई प्रकरणी त्यांची पुढील भूमिका स्पष्ट केली. तर ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात मुश्रीफ यांनी हायकोर्टात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले मुश्रीफ?
हसन मुश्रीफ म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी मुंबईत होतो. आज कागलमध्ये कुटुंबियांच्या भेटीसाठी आलो आहे. ईडीच्या चौकशीसाठी मी उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे माझे वकील यासंदर्भात ईडीकडून मुदत मागणार आहे. ज्या प्रकरणात माझा संबंधच नाहीत, त्याचे समन्स ईडीने पाठवले आहे.
हसन मुश्रीफ हायकोर्टात
हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. मुश्रीफ यांचे वकील प्रशांत पाटील यांनी ही माहिती दिली. हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील मूळ गुन्ह्यात हायकोर्टाने तपासास स्थगिती दिली असताना ईडी तपास करू शकत नाही. असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. मुश्रीफ यांच्याकडून दाखल केलेल्या रिट याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नेमकी याचिका काय?
हसन मुश्रीफ यांच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेत ईडीवर आरोप करण्यात आले आहेत. ईडीने सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाइन्स पालन केल्या नाहीत, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. ईडीच्या हालचालींवरून हसन मुश्रीफ यांना अटक करण्याची त्यांना घाई झाली आहे, असं स्पष्ट होतंय. राजकीय विरोधक किरीट सोमय्या हे मुश्रीफ यांना वारंवार टार्गेट करत असल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आलाय.कुठल्याही स्थितीत मुश्रीफ यांना अटक करण्याचा ईडीचा उद्देश असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय.
राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न?
हसन मुश्रीफ यांचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा उद्देश स्पष्ट होतोय असं मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आलंय. मागच्या 25 वर्षात कागलच्या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनाच लोकांनी पसंद केलंय,म्हणूनच त्यांना उध्वस्त करण्यासाठी हा राजकीय अजेंडा राबवला जात असल्याचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. 10 मार्चला मुश्रीफ यांना मुरगुडच्या एका गुन्ह्यात हायकोर्टाकडून संरक्षण मिळालेलं आहे. असं असतानाही ईडीच्या वतीने मुश्रीफ यांच्या अटकेची घाई केली जातेय, असा आरोप सदर याचिकेत करण्यात आलाय. या सगळ्या गोष्टी पाहता हायकोर्टाने यात तातडीने लक्ष घालणे गरजेचं आहे, अशी विनंती करण्यात आली आहे.