केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक, अभिनेत्यांना आश्रू अनावर, आता पुनर्बांधणीसाठी राज्यातील रंगकर्मींचा पुढाकार
Keshavrao Bhosale Natyagruha Fire upate: आमचे श्रद्धास्थान केशवराव भोसले नाट्यगृह आहे. त्या ठिकाणी लागलेल्या आगीची ती दृष्य मनाला फार विचलीत करणारे आहेत. मराठी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास त्या वास्तूने पाहिला आहे. त्या ठिकाणी माझेही विविध कार्यक्रम झाले आहेत. आता त्या ठिकाणी पुन्हा भव्य नाट्यगृह निर्माण व्हावे हिच माझी इच्छा आहे.
Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूर शहराचा सांस्कृतिक वैभवला गुरुवारी धक्का बसला. शहरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अग्नीतांडवामुळे जळून खाक झाले. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक होताना पाहून अनेक अभिनेत्यांना आश्रू अनावर झाले. अनेक अजरामर नाटके अन् असंख्य कलाकार घडवणारे हे नाटयगृह जळताना कलाकारांना त्यांचा आश्रूंचा बांध रोखता आला नाही. त्यातून सावरत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभरातील रंगकर्मींनी पुढाकार घेतला आहे. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृहातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. राजश्री शाहू महाराजांनी हे नाट्यगृह बांधून दिले होते.
राहिला फक्त सांगडाच
9 ऑगस्ट रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती होती. त्याच्या पूर्वसंध्येला आगीची घटना घडली. आगीच्या भीषण तांडवामुळे त्या ठिकाणी आता फक्त सभागृहाचा सांगडाच राहिला आहे. राज्यातील अनेक रंगकर्मींचे या सभागृहाशी भावनिक नाते होते. त्यामुळे ते जळत असताना त्यांना आपले आश्रू रोखता आले नाही. तब्बल तीन तासानंतर जवळपास 20 अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर त्या ठिकाणी फक्त सांगडा राहिला.
नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार
संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या धक्क्यातून सावरत नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी रंगकर्मींनी पुढाकर घेतला आहे. अनेक सामाजिक संस्थाही रंगकर्मींच्या मदतीला आल्या आहेत. उद्योजक, व्यापारी, देणगीदारांकडून मदतीची तयारी दर्शवली आहे. गायन समाज देवल क्लबचे संचालक चारुदत्त जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्यातील अनेक कलाकारांशी संपर्क साधला आहे. त्यात सुबोध भावे, अवधूत गुप्ते, सचिन खेडकर, मकरंद अनासपुरे यांचाही समावेश आहे. सर्वांनी मदतीची तयारी दर्शवली आहे.
पुन्हा भव्य नाट्यगृह व्हावे- आदेश बांदेकर
आदेश बांदेकर यांनी त्या ठिकाणी पुन्हा नाट्यगृह व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियात नाट्यगृहाला लागलेल्या आगीची बातमी पाहून मनाला यातना झाल्या. आमचे श्रद्धास्थान केशवराव भोसले नाट्यगृह आहे. त्या ठिकाणी लागलेल्या आगीची ती दृष्य मनाला फार विचलीत करणारे आहेत. मराठी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास त्या वास्तूने पाहिला आहे. त्या ठिकाणी माझेही विविध कार्यक्रम झाले आहेत. आता त्या ठिकाणी पुन्हा भव्य नाट्यगृह निर्माण व्हावे हिच माझी इच्छा आहे.
नाट्यगृहाला आगीच्या घटनेची चौकशीचे मुख्यमंत्र्याचे आदेश
काल कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे घटना अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी आहे. कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील कलाप्रेमी त्यामुळे दुःखी झाले आहेत. छत्रपति शाहू महाराजांनी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू अनेक दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांच्या सादरीकरणाची साक्षीदार होती. केशवराव भोसले यांची आज जयंती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडणे वेदनादायी आहे. मात्र ही वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहील आणि येथे कलाकृती घडत, सादर होत राहतील, अशी ग्वाही मी देतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची तरतूद केली जाईल. तसेच या घटनेची संपूर्णपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, हे मी जाहीर करतो. कोल्हापूरला कलेचा वारसा आहे आणि या शहराने कलाकारही घडवले आहेत. त्यामुळेच येथील कलेच्या वास्तू, कलाकार आणि कला या साऱ्याची जपणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.